Join us

Parliament Winter Session 2022: महात्मा गांधी यांचा फोटो नोटेवरुन हटविणार का? मोदी सरकारने संसदेत मांडले सूचक मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 7:16 PM

Parliament Winter Session 2022: भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी-गणेशाचा फोटो लावण्याच्या मागणीबाबत सरकारला विनंती करण्यात आली आहे का, असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता.

Parliament Winter Session 2022: अलीकडेच भारतीय चलनात असलेल्या नोटांवर कोणाचे चित्र असावे, ते असावे की नसावे, यावरून दावे-प्रतिदावे करण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय नोटांवर लक्ष्मी देवी आणि गणपती बाप्पा यांचा फोटो छापण्याची मागणी केली होती. यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सूचक मत मांडले आहे. 

लोकसभेत सरकारला विचारण्यात आले की, भारतीय चलनी नोटांवर लक्ष्मी देवी आणि गणेशाच्या फोटोंसह आणखी फोटो लावण्याच्या मागणीबाबत सरकारला काही विनंती करण्यात आली आहे का? अशा स्थितीत या मागणीबाबत सरकारची काय योजना आहे? या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबत सरकारला विनंती करून अशा प्रकारची मागणी केल्याचे मान्य केले आहे. स्वातंत्र्यसैनिकांपासून प्रतिष्ठित व्यक्ती, देवी-देवता, प्राण्यांची छायाचित्रे चलनी नोटांवर छापण्याची मागणी करण्यात आली आहे, असे चौधरी यांनी सांगितले. 

 सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे

पुढे चौधरी यांनी सांगितले की, आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २५ अंतर्गत, बँक नोट डिझाइन, फॉर्म आणि सामग्रीच्या वापराबाबत आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे, त्यानंतरच बदल शक्य आहेत. तत्पूर्वी, सन १९६९ मध्ये पहिल्यांदा महात्मा गांधींच्या १०० व्या जयंतीनिमित्त चलनावर महात्मा गांधींचे चित्र छापण्यात आले होते. त्यात महात्मा गांधी बसलेले दाखवले होते. सेवाग्राम आश्रमाच्या मागे छापले होते.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनावर गणपती आणि लक्ष्मी देवीचा फोटो लावण्याची मागणी केली होती. नोटेच्या एका बाजूला गांधीजींचा फोटो असेल आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी-गणेशाचा फोटो असेल, त्यामुळे संपूर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. लक्ष्मी समृद्धीची देवी मानले जाते, तर गणपती सर्व अडथळे दूर करतात, असे केजरीवाल यांनी म्हटले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :भारतीय चलनसंसदलोकसभा