मुंबई : देशातील ६ कोटी गुंतवणूकदारांना गंडा घालणाºया पर्ल्स कंपनीविरोधात सेबीची ढिसाळ कारवाई सुरू असल्याचा आरोप करत जनलोक प्रतिष्ठानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानात लाखो गुंतवणूकदार २६ फेब्रुवारीला एकवटणार आहेत. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनंदा कदम यांनी बुधवारी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत या मोर्चाची घोषणा केली.
गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यास सेबी अपयशी ठरत असल्याचा आरोप करत प्रतिष्ठानने या देशव्यापी मोर्चाची हाक दिल्याचे कदम यांनी सांगितले. कदम म्हणाल्या की, बुडीत कंपनीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आले आहेत. सेबी आणि सीबीआयच्या आकड्यांनुसार देशातील पर्ल्समार्फत ६ कोटी गुंतवणूकदारांचे एकूण ४९ हजार १०० कोटी रुपये वाटणे प्रलंबित आहे. आत्तापर्यंत यंत्रणेने पर्ल्सच्या सुमारे २७ हजार संपत्ती ताब्यात घेतल्या आहेत. मात्र त्यांचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे तत्काळ परत करण्याची मानसिकता सेबीची दिसत नाही. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सेबीवर हल्लाबोल मोर्चाची हाक दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीच्या आदेशानुसार पर्ल्स कंपनीच्या मालमत्ता लिलावामध्ये विकून गुंतवणूकदारांचे पैसे सहा महिन्यांत परत करण्याची गरज होती. या आदेशाला २ वर्षे उलटली असून त्या वेळी पर्ल्सने ३७० कोटी रुपये समितीकडे जमा केले.
मात्र प्रशासनांनी लोढा समिती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत पैशांचे वाटप केलेले नाही. म्हणून सेबीला येत असलेल्या अपयशांची कारणे विचारण्यासाठी गुंतवणूकदार मुंबईत धडकणार असल्याचे प्रतिष्ठानने स्पष्ट केले.
पर्ल्स गुंतवणूकदारांचा सेबीवर हल्लाबोल!, लाखो गुंतवणूकदार एकवटणार
देशातील ६ कोटी गुंतवणूकदारांना गंडा घालणाºया पर्ल्स कंपनीविरोधात सेबीची ढिसाळ कारवाई सुरू असल्याचा आरोप करत जनलोक प्रतिष्ठानने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:53 AM2018-02-22T05:53:45+5:302018-02-22T05:53:48+5:30