नवी दिल्ली : वाहन उद्याेगातून दिलासादायक बातमी आहे. देशातील प्रवासी वाहनांची विक्री ११ टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय ऑटाेमाेबाइल उत्पादक साेसायटीने (सियाम) दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे. ’सियाम’ने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीमध्ये २ लाख ७६ हजार ५५४ प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हा आकडा २ लाख ४८ हजार ८४० एवढा हाेता. त्यात यंदा ११.१४ टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे. तसेच दुचाकी विक्रीदेखील ६.६३ टक्क्यांनी वाढली आहे. यंदा जानेवारीत १४ लाख २९ हजार ९२८ दुचाकींची विक्री झाली आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी जानेवारीत १३ लाख ४१ हजार ०५ दुचाकी विकल्या गेल्या हाेत्या. दुचाकींमध्ये स्कूटर विक्रीचे प्रमाण जास्त दिसून आले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत ४ लाख १६ हजार ५६७ स्कूटर्स विक्रीच्या तुलनेत विक्रीचा आकडा यंदा ४ लाख ५४ हजार ३१५ एवढा हाेता. त्यात यंदा ९.०६ टक्के वाढ झाली आहे. माेटरसायकल विक्रीदेखील गेल्या वर्षीच्या ८ लाख ७१ हजार ८८६ तुलनेत यंदा ९ लाख १६ हजार ३६५ एवढी झाली आहे. तीनचाकी वाहन विक्रीमध्ये मात्र अर्ध्याहून अधिक घट झाली आहे. गेल्या वर्षी ६० हजार ९०३ तीनचाकी वाहनांची विक्री झाली हाेती. यंदा केवळ २६ हजार ३३५ वाहनांचीच विक्री झाली आहे. एकूण वाहन विक्रीतही वाढदेशातील एकूण वाहन विक्रीमध्ये ४.९७ टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या १६ लाख ५० हजार ८१२ विक्रीच्या तुलनेत यंदा १७ लाख ३२ हजार ८१७ वाहनांची विक्री नाेंदविण्यात आली आहे. काेराेना लाॅकडाऊनच्या काळात वाहन उद्याेगाला माेठा फटका बसला हाेता. सप्टेंबरनंतर काही प्रमाणात विक्री वाढली आणि सणासुदीच्या काळात एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली.
जानेवारीत प्रवासी वाहनांच्या विक्रीत ११ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 4:35 AM