नवी दिल्ली : मार्चमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ४.८७ टक्क्यांनी घटली. या महिन्यात २,७१,३५८ प्रवासी वाहनांची विक्री झाली. मार्च २०२१ मध्ये २,८५,२४० वाहने विकली गेली होती.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (फाडा) ही माहिती दिली. फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, वास्तविक प्रवासी वाहनांची मागणी उच्च राहिली. मात्र सेमी कंडक्टरच्या टंचाईमुळे वाहनांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने खरेदीदारांना दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत सेमीकंडक्टरचा पुरवठा काही प्रमाणात सुधारला असला तरी त्याच्या उपलब्धतेची आव्हाने संपलेली नाहीत. रशिया-युक्रेन युद्ध आणि चीनमध्ये पुन्हा सुरू झालेले लॉकडाऊन यामुळे सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यावर पुन्हा परिणाम होणार आहे.
दुचाकी वाहनांची विक्री ४.०२ टक्क्यांनी घसरून ११,५७,६८१ युनिटवर आली आहे. मागच्या वर्षी या काळात १२,०६,१९१ वाहनांची विक्री झाली होती. गुलाटी यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील संकटामुळे दुचाकी क्षेत्राची कामगिरी आधीच खालावलेली होती. त्यातच इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहन बाळगण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे विक्रीवर आणखी परिणाम झाला.
व्यावसायिक वाहनांची विक्री मात्र १४.९१ टक्क्यांनी वाढून ७७,९३८ युनिटवर गेली. गेल्या वर्षी मार्चमध्ये हा आकडा ६७,८२८ होता. तीनचाकी वाहनांची विक्रीही २६.६१ टक्क्यांनी वाढून ४८,२८४ युनिटवर गेली. मार्च २०२१ मध्ये हा आकडा ३८,१२५ युनिट इतका होता.सर्व श्रेणींतील वाहनांची मिळून एकत्रित विक्री २.८१ टक्क्यांनी घसरली आहे. १६,१९,१८१ वाहने मार्च २०२२ मध्ये विकली गेली. मार्च २०२१ मध्ये १६,६६,९९६ वाहनांची विक्री झाली होती.
वर्षभरात झाली १४.७ टक्क्यांची वाढ
देशामधील कोरोनाचे निर्बंध हटल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये १४.७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे ॲक्युट रेटिंग्ज या कंपनीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. देशातील व्यापारी वाहनांच्या विक्रीमध्येही २५.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या सहामाहीमध्ये मागणीत मोठी वाढ झालेली असल्याने ही वाढ शक्य झाल्याचे अहवालात नमूद केले गेले आहे. आगामी तिमाहीमध्ये मागणी मध्यम स्वरूपात राहण्याचा अंदाजही या अहवालात वर्तविला गेला आहे.