नवी दिल्ली - यंदा भीषण उष्णता आणि लोकसभा निवडणुका यामुळे प्रवासी वाहनांच्या विक्रीला मे महिन्यात फटका बसला आहे. प्रवासी वाहनांची विक्री १ टक्का घटून ३,०३,३५८ वर आली. मे २०२३ मध्ये ३,३५,१२३ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती.
वाहन उद्योग क्षेत्रातील संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’चे (फाडा) अध्यक्ष मनीष राज सिंघानिया यांनी सांगितले की, ‘मेमधील विक्रीतील घसरगुंडीमागे निवडणुका आणि भीषण उष्णता कारणीभूत आहे, असे वाहन डीलरांनी सांगितले.’
सिंघानिया यांनी म्हटले की, पुरेसा पुरवठा, प्रलंबित बुकिंग व सूट योजना अशा अनुकूल स्थितीतही विक्रीमध्ये घट झाली. नवीन मॉडेल्सची कमतरता, स्पर्धा व मूळ उपकरण उत्पादकांच्या विपणन व्यवस्थेतील त्रुटी यामुळे विक्रीवर परिणाम झाला. शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत उष्णतेमुळे तब्बल १८ टक्के घट झाली.
दुचाकींच्या विक्रीत वाढ- मेमध्ये दुचाकी वाहनांची विक्री २% वाढून १५,३४,८५६ वर गेली. मागील वर्षी या महिन्यात १४,९७,७७८ दुचाकी वाहने विकली गेली होती. - व्यावसायिक वाहनांची विक्री मेमध्ये ४ टक्के वाढून ८३,०५९ वर गेली. मे २०२३ मध्ये ७९,८०७ व्यावसायिक वाहनांची विक्री झाली होती.