नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत देशातील २१५ टपाल कार्यालयांत पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्रीय दळणवळणमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत ही माहिती दिली.काँग्रेसचे शशी थरुर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सिन्हा म्हणाले की, देशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात किमान एक पासपोर्ट केंद्र असावे, असा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार, टपाल कार्यालय पासपोर्ट सेवा केंद्रांची स्थापना केली आहे.एका प्रश्नाच्या उत्तरात मनोज सिन्हा यांनी सांगितले की, पासपोर्ट काढण्यासाठी कोणालाही ५0 किमीपेक्षा जास्त अंतर प्रवास करावा लागू नये. ५0 किमीच्या आत पासपोर्ट सेवा देणारे केंद्र असायला हवे, असा निर्णय आम्ही घेतला होता. त्यानुसार, टपाल कार्यालयांत पासपोर्ट सेवा केंद्रे उघडण्यात आली आहेत.>उत्पन्नामध्ये सतत वाढसिन्हा म्हणाले की, बदलत्या काळानुसार टपाल खात्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. याचे चांगले परिणाम दिसत आहेत. भारतीय टपाल विभागाला अपरंपरागत क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न सातत्याने वाढत आहे. अपरंपरागत सेवांत ई-कॉमर्स आणि मूल्यवर्धित सेवांचा समावेश आहे. यातून टपाल खात्याला चांगला महसूलही मिळत आहे.
२१५ टपाल कार्यालयांत पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:16 AM