Join us

Patanjali Ads: दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बाबा रामदेव-बाळकृष्ण यांनी बिनशर्त छापली माफी, न्यायालय म्हणालं...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 2:41 PM

पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी दोघांच्यावतीनं बिनशर्त माफी मागणारं माफीनामा पत्र छापण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Patanjali Ads: पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. कंपनीचे संस्थापक योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या वतीनं बिनशर्त माफी मागणारं माफीनामा पत्र छापण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जाहिरात प्रकरणात योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे ​​एमडी आचार्य बाळकृष्ण यांनी वृत्तपत्रांमध्ये माफीनामा प्रकाशित केला असल्याचं त्यांच्या वतीनं न्यायालयाला सांगण्यात आलं. झालेल्या चुकांसाठी बिनशर्त माफी मागणारी अतिरिक्त जाहिरातही दिली जाणार असल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलं. 

सर्वोच्च न्यायालयानं पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे ​​एमडी बाबा रामदेव यांना दोन दिवसांत वर्तमानपत्रात प्रकाशित माफीनामा रेकॉर्डवर ठेवण्यास सांगितलं आहे. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठानं बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या वकिलांना वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माफीनाम्याच्या पत्राची प्रत न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले. 

६७ वर्तमानपत्रात माफीनामा पत्र प्रकाशित 

सोमवारी देशभरातील ६७ वृत्तपत्रांमध्ये माफीनामा प्रकाशित केला असल्याची माहिती या दोघांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितलं. खंडपीठानं या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी निश्चित केली आहे. न्यायालयाने १६ एप्रिल रोजी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना ‘ॲलोपॅथीची बदनामी’ करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे निर्देश दिले होते. पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी न्यायालयानं त्यांना आठवडाभरात "जाहीरपणे माफी मागण्याची आणि पश्चाताप व्यक्त करण्याची" परवानगी दिली होती. त्यांना यात कोणताही दिलासा दिला जाणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. 

सर्वोच्च न्यायालय इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) २०२२ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत आहे. यामध्ये कोविड लसीकरण आणि आधुनिक वैद्यकीय पद्धतींविरोधात चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप करण्यात आलाय.

टॅग्स :रामदेव बाबापतंजलीसर्वोच्च न्यायालय