नवी दिल्ली: रामदेव बाबांचीपतंजली आयुर्वेद लवकरच रुची सोया कंपनी खरेदी करणार आहे. यासाठीचा व्यवहार अंतिम टप्प्यात आला आहे. कर्जदारांच्या कमिटीच्या (सीओसी) बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. हा संपूर्ण व्यवहार लवकरच पूर्ण होऊन त्याबद्दलची घोषणा या महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली.
रुची सोया कंपनीच्या कर्जदारांची मंगळवारी बैठक झाल्याच्या वृत्ताला पतंजली आयुर्वेदचे प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी दिली. मात्र त्यांनी याबद्दल अधिक भाष्य करण्यास नकार दिला. याबद्दल रुची सोया कंपनीला ई-मेल केल्याची माहिती 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिली. मात्र कंपनीनं या ई-मेलला उत्तर दिलं नाही. गेल्या महिन्यात पतंजलीनं कर्जात बुडालेल्या रुची सोया कंपनी खरेदी करण्यासाठी लावलेली बोली वाढवून 4,350 कोटी रुपयांवर नेली. याच कंपनीसाठी अदानी विल्मरनं 4,100 कोटी रुपयांची बोली लावली होती.
पतंजलीनं रुची सोयासाठी 4,350 कोटी रुपयांची बोली लावली. यातील 115 कोटी रुपये शेअर्सच्या रुपात येणार आहेत. तर 4,235 कोटी रुपये कंपनीच्या कर्जदारांना दिले जातील. सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय आणि एसबीआय या बँकांनी रुची सोयाला सर्वाधिक कर्ज दिलं आहे. कर्जदारांना द्याव्या लागणाऱ्या 4,235 कोटी रुपयांची सविस्तर माहिती लवकरच पतंजलीकडून बँकांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात कर्जदारांची बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
रामदेव बाबांचे अच्छे दिन; पतंजलीचा अदानी समूहाला धोबीपछाड
रुची सोया कंपनीसाठी सर्वाधिक बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 08:46 PM2019-04-11T20:46:18+5:302019-04-11T20:47:04+5:30