Join us

'या' निर्णयामुळे बाबा रामदेव यांना दिलासा मिळण्याची शक्यता, IT क्षेत्रात होणार एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 9:56 AM

आयटी क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे.

आयटी क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) मुंबई खंडपीठानं कर्जबाजारी रोल्टा इंडिया लिमिटेडसाठी पुन्हा बोली लावण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदासाठी ऑफरचा मार्ग मोकळा झाला आहे. रामदेव यांच्या पतंजलीने रोल्टा इंडिया खरेदी करण्यात रस दाखवला आहे. 

काय म्हटलंय एनसीएलटीनं? 

एका आदेशात, न्यायमूर्ती प्रभात कुमार आणि न्यायमूर्ती वीरेंद्र सिंह बिश्त यांच्या खंडपीठानं म्हटलंय की पतंजली तसंच इतर सर्व अर्जदार ज्यांनी बोली सादर केली आहे त्यांना त्यांच्या बिड्समध्ये सुधारणा करण्याची परवानगी दिली पाहिजे. हे खंडपीठ कर्जदारांच्या समितीला (CoC) अर्जदाराच्या संकल्प योजनेवर विचार करण्याची परवानगी देत आहे. ज्या अर्जदारांनी स्वारस्य दाखवलंय त्यांना एक संधी दिली पाहिजे, असं न्यायालयानं म्हटलं. दरम्यान पुणेस्थित ॲशडॉन प्रॉपर्टीजनं यासाठी सर्वाधिक ७६० कोटी रुपयांची सर्वात मोठी बोली लावली होती. तर नंतर पतंजलीनं ८३० कोटी रुपयांची ऑल कॅश ऑफर दिली होती. 

कर्जाच्या ओझ्याखाली कंपनी   

रोल्टा इंडियानं १४०० कोटी रुपयांचं मोठं कर्ज घेतलं आहे. कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असल्यानं आता कर्जाची परतफेड करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे युनियन बँक ऑफ इंडियानं दाखल केलेल्या याचिकेवर जानेवारी २०२३ मध्ये दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली. युनियन बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाकडून रोल्टा इंडियानं  (Rolta India Loan) ७१०० कोटी रुपयांचं कर्ज घेतले आहे. त्याच वेळी, सिटीग्रुपच्या नेतृत्वाखालील बँकांकडून अनसिक्युअर्ड ६६९९ कोटी रुपये घेतले आहेत. कमल सिंह हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. 

काय करते कंपनी?  

ही आयटी कंपनी आहे. कंपनी डिफेन्स अँड होम लँड सिक्युरिटी, पॉवर फायनान्शिअल सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि हेल्थकेअरमध्ये सेवा पुरवण्याचं काम करते. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीला १००० कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर या कालावधीत महसूल केवळ ३८ कोटी रुपये होता.

टॅग्स :रामदेव बाबापतंजली