नवी दिल्ली : बाबा रामदेव यांनी आयुर्वेदिक उत्पादनांनंतर पतंजलीला दुग्धव्यवसायातही उतरवले आहे. गुरुवारी दिल्लीयेथील तालकटोरा स्टेडियमवरील एका कार्यक्रमात दूध, दह्यासह पाच नवी उत्पादने लाँच केली आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत पतंजलीचेदूध दोन रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
पतंजलीने टुथपेस्टपासून मध, तुपापर्यंत दैनंदिन वापरातील आयुर्वेदिक उत्पादनांना भारतीय बाजारात उतरवून जागतिक दर्जाच्या कंपन्यांना सळो की पळो करून सोडले होते. आता दुग्धव्यवसायामध्येही पंतजलीने आपली उत्पादने आणली आहेत. दूध, दही, पनीर आणि ताक ही उत्पादने त्यांनी आजपासून विक्रीला उपलब्ध केली. तसेच पतंजली लवकरच फ्लेवर्ड दूधही बाजारात आणणार आहे. पतंजलीने दूग्धजन्य पदार्थांसाठी दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पुणे आणि मुंबईमधील जवळपास 56 हजार दूध विक्रेत्यांशी करार केला आहे. या जोरावर 2019-20 पर्यंत 10 लाख लीटर दूध उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
याबरोबरच पतंजलीने आज बाटली बंद पाणी विकण्याची घोषणा केली. दिव्य जल नावाने हे पाणी विकले जाणार आहे. हे पाणी हर्बल पाणी असणार असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला. विदेशी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी फ्रोजन भाज्या (मटार, स्वीट कॉर्न, फिंगर चिप्स) लाँचे केल्या आहेत. तसेच सोलर पॅनल आणि गायींना लागणारे खाद्यही पुढील काळात आणणार असल्याचे रामदेव बाबा यांनी सांगितले.