Patanjali Foods Q4 results: योगगुरू रामदेव बाबा यांची कंपनी पतंजली फूड्सनं (Patanjali Foods) मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २२ टक्क्यांनी घसरून २०६.३२ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३ च्या मार्च तिमाहीत तो २६३.७१ कोटी रुपये होता.
आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत परिचालनातून मिळणारा महसूल ४ टक्क्यांनी वाढून ८,२२१ कोटी रुपये झाला आहे, जो आर्थिक वर्ष २०२३ च्या मार्च तिमाहीत ७,८७३ कोटी रुपये होता. पतंजली फूड्स पूर्वी रुची सोया इंडस्ट्रीज या नावानं ओळखली जात होती.
फूड आणि एफएमसीजी सेगमेंटची डिटेल
पतंजली फूड्सच्या फूड आणि एफएमसीजी सेगमेंटनं मार्च तिमाहीत २,७०४.६१ कोटी रुपयांच्या सर्वोच्च तिमाही उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे. एका तिमाहीपूर्वी तो २,४९८.६२ कोटी रुपये होता. या अर्थानं त्यात ८.२४ टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू तिमाहीत फूड आणि एफएमसीजी विभागातील महसुलाचा वाटा एकूण उत्पन्नाच्या ३२.५७ टक्के आहे. कंपनीचं एकूण उत्पन्न ३१,७२१.३५ कोटी रुपये होतं. एकूण महसुलापैकी फूड आणि एफएमसीजी विभागातील वाटा ९,६४३.३२ कोटी रुपयांची आहे. दरम्यान, मंगळवारी पंतजलीच्या शेअरमध्ये तेजीही दिसून आली होती.
पतंजली फूड्सचा प्लान
अलीकडेच पतंजली फूड्सनं प्रवर्तक समूह पतंजली आयुर्वेदच्या बिगर खाद्य व्यवसायाचं अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाचं मूल्यमापन करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, कंपनीनं कोणत्या प्रकारच्या नॉन-फूड प्रॉडक्ट्स खरेदी करण्याचा विचार केला आहे, याचा उल्लेख केलेला नाही. परंतु डेंटल केअर, होम केअर, पर्सनल केअर कॅटेगरीतील उत्पादनं मिळविण्याचा विचार केला जाईल, असं सूत्रांनी सांगितलं. बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील प्रवर्तक समूहाच्या एकूण व्यवसायात या उत्पादनांचा वाटा ५० ते ६० टक्के आहे.