नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीने स्वामी कर्मवीर यांच्या कल्पामृत आयुर्वेद या कंपनीला कोर्टात खेचले आहे. मजेची बाब म्हणजे बाबा रामदेव व स्वामी कर्मवीर हे दोघे गुरुबंधू असून ते बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांचे माजी भागीदारसुद्धा आहेत.पतंजली शब्दावरून वाद
बाबा रामदेव यांच्या कंपनीचे नाव पतंजली आयुर्वेद आहे तर स्वामी कर्मवीर यांची कंपनी कल्पामृत आयुर्वेद आहे. परंतु दोन्ही कंपन्या आयुर्वेदावर आधारित नित्योपयोगी ग्राहक उत्पादने बनवतात व विकतात. परंतु कल्पामृत आयुर्वेद आपल्या सर्व उत्पादनांवर ‘महाऋषी पतंजली परिवार’ असा ठळक उल्लेख करते. यातील पतंजली शब्दावरून हा वाद उभा झाला आहे.
पतंजली आयुर्वेदचा महाऋषी पतंजली परिवार या वाक्याला विरोध आहे. कल्पामृत आयुर्वेद ‘पतंजली’ शब्द वापरून पतंजली आयुर्वेदच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन करीत आहे, असे मानून पतंजलीने कल्पामृत विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्याच सुनावणीत न्यायालयाने कल्पामृतला पुढील आदेशापर्यंत ‘पतंजली’ हा शब्द वापरण्यास बंदी घातली आहे.
विशेष म्हणजे २५ वर्षांपूर्वी बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण व स्वामी कर्मवीर या तिघांनी मिळून दिव्ययोग मंदिर ट्रस्टची स्थापना करून पतंजली आयुर्वेदमार्फत नित्योपयोगी ग्राहक उत्पादने विकण्याची सुरुवात केली होती. व्यावसायिक मतभेद झाल्यामुळे १२ वर्षांपूर्वी स्वामी कर्मवीर भागीदारीतून वेगळे झाले व त्यांनी कल्पामृत आयुर्वेद ही नवी स्पर्धक कंपनी सुरू केली. खटल्याची पुढील सुनावणी ७ मे रोजी आहे.