नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (PNB) रुपेच्या (RuPay) सहकार्याने पतंजली क्रेडिट कार्डला(Patanjali Credit Card) झेंडा दाखवला. पतंजली क्रेडिट कार्डच्या लॉन्च प्रसंगी बाबा रामदेव म्हणाले की, ग्राहकांना पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurved) उत्पादने खरेदीवर मोठी सूट मिळेल. क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी ग्राहकांना 50 दिवसांचा अवधी मिळेल. बिल भरण्यास असमर्थ असलेले ग्राहक 18 महिन्यांत 12 टक्के व्याजासह बिल भरू शकतील.
दरम्यान, या वर्षी जानेवारीमध्ये बाबा रामदेव यांनी पीएनबीचे क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची घोषणा केली होती. पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पीएनबी रुपे पतंजली क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना अनेक फायदे मिळतील. यात दोन अॅडऑन कार्डही मिळतील. तुमच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या हातात क्रेडिट कार्ड देऊ शकता. तसेच, या कार्डचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे, त्याची सुविधा त्यात देण्यात आली आहे, असे आचार्य बाळकृष्ण म्हणाले.
5 लाख रुपयांचे विमा संरक्षण
या कार्डमध्ये कॅशबॅक, लॉयल्टी पॉइंट्स, इन्शुरन्स कव्हर असे फीचर्स दिले आहेत. तसेच, यामध्ये ग्राहकांना पीएनबीकडून 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. दरम्यान, स्वदेशी समृद्धी कार्डवरही ग्राहकांना 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. पतंजलीच्या वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना 5 ते 7 टक्के सूट मिळणार आहे. या क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही कोणत्याही कंपनीच्या वस्तू खरेदी करू शकता.
#PNB, #RUPAY के सहयोग से #पतंजलि का Credit Card https://t.co/pmXk3LAmdo
— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) March 2, 2022
या ठिकाणी बनवू शकता पतंजली क्रेडिट कार्ड
आचार्य बाळकृष्ण म्हणाले, पतंजलीचे क्रेडिट कार्ड पतंजलीचे मेगा स्टोअर, पतंजलीचे हॉस्पिटल आणि पीएनबीच्या सर्व शाखांमध्ये बनवले जाऊ शकते. 60 टक्के क्रेडिट कार्ड पतंजली आयुर्वेद आणि 40 टक्के पंजाब नॅशनल बँक बनवणार आहे.
दोन प्रकारांमध्ये क्रेडिट कार्ड
PNB RuPay पतंजली क्रेडिट कार्डचे दोन प्रकार आहेत. PNB RuPay Platinum आणि PNB RuPay Select कार्ड. ही दोन्ही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड संपर्करहित आहेत. या क्रेडिट कार्डद्वारे पतंजलीच्या स्टोअरमध्ये खरेदी केल्यावर ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. प्रत्येक वेळी तुम्ही 2,500 रुपयांपेक्षा जास्त किमतीत खरेदी करता तेव्हा तुम्हाला 2% कॅशबॅग मिळेल. मात्र, हा कॅशबॅक एका व्यवहारावर 50 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. याशिवाय, कार्ड सक्रिय होताच 300 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.