नवी दिल्ली- योगगुरू रामदेव बाबांचा पतंजली समूह दिवसेंदिवस प्रगतीची अनेक शिखरं पादाक्रांत करत आहे. पतंजलीच्या स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांना भारतीय ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहानं आता टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे.रामदेव बाबांच्या पतंजली उद्योगसमूहानं रविवारी एक सिम कार्ड लाँच केले असून, त्याचं 'स्वदेशी समृद्धी सिम कार्ड' असं नामकरणही केलं आहे. तसेच या नव्या सिम कार्डसाठी पतंजलीनं बीएसएनएलशी करारही केला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि पतंजली यांनी संयुक्तपणे हे सिम कार्ड लाँच केले.विशेष म्हणजे सद्यस्थितीत हे सिम कार्ड फक्त पतंजली उद्योग समूहातील कर्मचा-यांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. 2जी नेटवर्क असलेल्या या सिम कार्डवरून 144 रुपयांचे रिचार्ज केल्यास ग्राहकाला 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळणार आहे. तसेच या सिम कार्डवरून पतंजलीची उत्पादने मागवल्यास 10% सूटही देण्यात येणार आहे. पतंजली सिम कार्डचे फायदे- पतंजली सिम कार्डवर तुम्हाला फक्त 144 रुपयांचं रिचार्ज केल्यास अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच या 144 रुपयांच्या पॅकमध्येच 2GB डेटा आणि 100 एसएमएस सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. - हे सिम कार्ड सध्या फक्त पतंजली कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मात्र जेव्हा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर या कार्डवरून पतंजलीची उत्पादन मागवल्यास 10% सूट दिली जाणार आहे. - एवढेच नव्हे, तर या सिम कार्डच्या ग्राहकाला 2.5 लाख रुपयांपर्यंतचे मेडिकल लाइफ इन्शुरन्स आणि 5 लाख रुपयांपर्यंतचे लाइफ इन्शुरन्स उपलब्ध करून दिले जाणार आहे.
लवकरच बाजारात येणार पतंजलीचं सिम कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 7:36 PM