Join us

आता पतंजली पाम तेलाचे उत्पादन करणार, 5 लाख शेतकऱ्यांना होणार थेट फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 2:23 PM

बाबा रामदेव म्हणाले की, शेतकरी एका खास प्रकारच्या पाम तेलाची लागवड करतील. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन मिळणार आहे.

योग गुरु बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी आता स्वतः पाम तेलाचे उत्पादन करणार आहे. यासंदर्भात खुद्द बाबा रामदेव यांनी घोषणा केली आहे. गुरुवारी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, पतंजली आता स्वतः पाम तेलाचे उत्पादन करणार आहे. पामच्या लागवडीसाठी शेतकरी पतंजलीशी जोडले जातील. 

दरम्यान, बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत पामतेलची लागवड करणारे 40 हजार शेतकरी पतंजलीमध्ये सामील झाले आहेत. येत्या काळात त्यांची संख्या 5 लाखांपर्यंत वाढवायची आहे. अशा स्थितीत पतंजलीमध्ये पाम तेलाचे उत्पादन सुरू केल्यानंतर 5 लाख शेतकऱ्यांना थेट रोजगार मिळणार आहे.

बाबा रामदेव म्हणाले की, शेतकरी एका खास प्रकारच्या पाम तेलाची लागवड करतील. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन मिळणार आहे. पाम तेलाच्या या नवीन जातीचे वयही पूर्वीपेक्षा जास्त आहे. आता त्याची लागवड सुरू केल्यानंतर तुम्ही 40 वर्षांपर्यंत पिके घेऊ शकता. 

पूर्वी पाम तेलाचे उत्पादन हेक्टरी 16 ते 18 टन होते, मात्र आता नवीन जातीची लागवड केल्यास 20 ते 25 टन उत्पादन मिळेल. शेतकरी बांधवांनी एक हेक्टरमध्ये पाम तेलाची लागवड केल्यास पाच वर्षांत तुमच्या बागेला फळे येऊ लागतील. अशा प्रकारे एक हेक्टरमधून दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे, असे बाबा रामदेव म्हणाले.

याचबरोबर, आसाम, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसह 12 राज्यांतील शेतकरी पतंजलीशी संलग्न होऊन पाम तेलाची लागवड करत आहेत, असे बाबा रामदेव म्हणाले. याशिवाय, पतंजलीच्या नर्सरीमध्ये एक कोटी तेल पाम प्लांट तयार करण्यात आले आहेत. येत्या 5 ते 6 वर्षात त्याची संख्या 8 ते 10 दशलक्षांपर्यंत वाढवायची आहे, असे बाबा रामदेव यांनी सांगितले.

पतंजलीने पाम तेलाचे उत्पादन सुरू केल्याने देशाला मोठा फायदा होईल, असे बाबा रामदेव यांचे म्हणणे आहे. तसेच, परदेशातून पैसे खर्च करून पामतेल आयात करावे लागणार नाही. यामुळे भारताचे 2 लाख कोटी रुपये वाचतील.

दरम्यान, भारतात पाम तेलाचा वापर खूप जास्त आहे. पाम तेलाचा हा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारतात पाम तेलाचा वापर दरवर्षी 9 दशलक्ष टन आहे. विशेष बाब म्हणजे भारतातील खाद्यतेलाच्या एकूण वापरापैकी 40 टक्के वाटा पाम तेलाचा आहे.

टॅग्स :पतंजलीरामदेव बाबा