करनीती भाग १८२ - सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमधील विशिष्ट तरतुदीमध्ये अॅडव्हान्सवर जीएसटी भरण्याची तरतूद आहे. या विषयी माहिती सांग.कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, एक्साइज व व्हॅट कायद्यामध्ये अॅडव्हान्समध्ये कर भरावा लागत नाही. फक्त सेवाकराच्या तरतुदीनुसार अॅडव्हान्सवर सेवाकर करदात्याला भरावा लागतो. जीएसटीमध्ये वस्तू व सेवा यांच्या अॅडव्हान्सवर जीएसटी भरावा लागणार आहे.अर्जुन : कृष्णा, अॅडव्हान्सवर जीएसटी म्हणजे नेमके काय?कृष्ण : अर्जुना, वस्तू व सेवा यांच्या पुरवठ्याच्या आधारे आधी खरेदी करणाऱ्याने जर अॅडव्हान्स दिला, तर त्यावर जीएसटी द्यावा लागेल. उदा. जर १० लाख रुपयांची स्टेशनरी घेण्यासाठी एका व्यक्तीने दुकानदाराला आॅर्डर दिली व त्या वेळेस अॅडव्हान्स ५ लाख रुपये दिले, तर त्याला ५ लाख रुपयांवरती जीएसटी त्या वेळेसच दुकानदाराला द्यावा लागेल.अर्जुन : कृष्णा, विक्रेत्याने अॅडव्हान्स घेताना काय करावे?कृष्ण : अर्जुना, विक्रेत्याने अॅडव्हान्स घेताना खरेदीदाराला रिसिप्ट व्हाउचर बनवून द्यावे लागेल. या रिसिप्ट व्हाउचरमध्ये त्याला नाव, पत्ता, जीएसटी नंबर रिसिप्टचा १६ पेक्षा कमी शब्द व अंक मिळून नंबर, तारीख व अॅडव्हान्स देणाऱ्याचा नाव, पत्ता व जीएसटी नंबर, वस्तू किंवा सेवेची माहिती, अॅडव्हान्सची रक्कम, जीएसटीचा दर, जीएसटीची रक्कम व विक्रेत्याची सही नमूद करावी लागेल, तसेच विक्रेत्याला जीएसटीचे रिटर्न दाखल करताना रिसिप्टची माहिती रिटर्नमध्ये नमूद करावी लागेल.अर्जुन : कृष्णा, वस्तू किंवा सेवा पुरवठा झाल्यानंतर काय करावे?कृष्ण : अर्जुना, विक्रेता वस्तू किंवा सेवेचा पुरवठा झाल्यानंतर त्याचे टॅक्स इन्व्हाइस बनवेल व त्यामध्ये अॅडव्हान्स मिळालेली रक्कम वजा करून, उरलेल्या रकमेवर जीएसटी आकारेल. उदा. जर विक्रेत्याले रु. १० लाखांचा स्टेशनरीचा पुरवठा केला, तर त्यामध्ये ३ महिन्यांआधी ५ लाख रु. अॅडव्हान्स मिळाला, तर त्याला उरलेल्या ५ लाख रुपयांवर जीएसटी टॅक्स इन्वाइसमध्ये आकारावा लागेल, तसेच अॅडव्हान्सची माहिती टॅक्स इन्वाइसमध्ये नमूद करावी लागेल.अर्जुन : कृष्णा, अॅडव्हान्स देणाऱ्याला वस्तू किंवा सेवांचे क्रेडिट वेव्हर मिळेल?कृष्ण : अर्जुना, खरेदीदाराला अॅडव्हान्स दिल्यानंतर त्या वेळेस विक्रेत्याला दिलेल्या जीएसटीचे क्रेडिट मिळणार नाही. खरेदीदाराला ज्या वेळेस विक्रेता वस्तू किंवा सेवेचा पुरवठा करेल व टॅक्स इन्वाइस देईल, तेव्हा क्रेडिट मिळेल. उदा. ‘अ’ ने ‘ब’ ला १५ लाख रुपयांच्या मशिनरी खरेदीसाठी १० लाख रुपयांचा अॅडव्हान्स व त्यावर उरलेल्या ५ लाखांवर ५० हजार रुपयांचा जीएसटी लावेल. त्यानंतर ‘अ’ ला एकूण १.५ लाख रुपयांचे जीएसटीचे क्रेडिट घेता येईल.अर्जुन : कृष्णा, जर अॅडव्हान्स घेताना वस्तू किंवा सेवेचा जीएसटीचा दर निश्चित करण्यायोग्य नसेल किंवा पुरवठ्याचा प्रकार निश्चित करता येत नसेल, तर काय करावे?कृष्ण : अर्जुना, १) जर अॅडव्हान्स घेताना वस्तू किंवा सेवेचा जीएसटीचा दर निश्चित करण्यायोग्य नसेल, तर त्यावर जीएसटी दर १८ टक्के आकारावा लागेल. उदा. जर व्यक्तीने एखादी वस्तू बनविण्यासाठी आॅर्डर व अॅडव्हान्स दिले, परंतु त्या वस्तूवरील जीएसटीचा दर निश्चित नसेल, तर त्या अॅडव्हान्सवर १८ टक्के जीएसटी द्यावा लागेल. २) जर अॅडव्हान्स घेताना पुरवठ्याचा प्रकार निश्चित करता येत नसेल, तर या पुरवठ्याला आंतरराज्यीय पुरवठा मानावा. उदा. एका व्यक्तीचे वस्तू बनविण्याचे ठिकाण दोन राज्यात असेल, परंतु अॅडव्हान्स घेताना कोणत्या राज्यातून पुरवठा होईल हे निश्चित नसेल, तर त्याला आंतरराज्यीय पुरवठा ग्राह्य धरावा.
लक्ष द्या; अॅडव्हान्सवरसुद्धा जीएसटी भरावा लागेल!
By admin | Published: May 22, 2017 12:48 AM