Join us  

Rent Agreement बनवताना या गोष्टींकडे नक्की ठेवा लक्ष, अन्यथा नंतर पडू शकतं तुम्हाला भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 1:14 PM

अनेकदा लोक नोकरीनिमित्त निरनिराळ्या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यावेळी भाड्याच्या घराशिवाय पर्यायच नसतो.

आजच्या काळातही असे अनेक लोक आहेत ज्यांना काही कारणास्तव भाड्याच्या घरात राहावं लागतं किंवा ते भाड्याच्याच घरात राहणं पसंत करतात. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये, नोकरी करणारे लोक देखील इतर शहरांमध्ये आपली घरं सोडून भाड्याच्या घरात राहून नोकरी करतात. भाडेकरू आणि घरमालक यांच्यात एक लेखी करार असतो, ज्याला भाडे करार म्हणतात.

हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या करारामध्ये भाडं आणि घराशी संबंधित व्यवस्थांबाबत काही सूचना असतात. ज्यावर घरमालक, भाडेकरू आणि साक्षीदार यांच्या स्वाक्षऱ्याही असतात. ते बनवताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.

केव्हा वाढणार भाडंसर्वप्रथम, तुम्ही घरमालकाला दर महिन्याला किती भाडं द्यायचं आणि घरमालक तुमचं भाडे कधी वाढवणार हे ठरवून घ्या. भाडे करारावर मासिक भाडं नमूद करावं. परंतु जर भाडेवाढीचा उल्लेख भाडे करारात नसेल आणि घरमालकाला भविष्यात ते निश्चित करायचं असेल, तर तुम्हाला ते कमी जास्त करण्याची संधीही मिळू शकते. साधारणपणे घराचं भाडे दरवर्षी १० टक्क्यांनी वाढतं. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही यावर सहमत होऊ शकता किंवा तुम्ही घरमालकाला भाडे थोडे कमी करण्यासाठी विनंती करू शकता.

कोणत्या बिलांचा उल्लेखभाडे करारावर अनेक प्रकारच्या अटी व शर्ती लिहिलेल्या असतात. ते अतिशय काळजीपूर्वक वाचा. यावर घरमालकाला भाडं उशिरा दिल्यास काही दंड नमूद केला आहे का ते पहा. याशिवाय, तुम्ही वीज, पाणी बिल, हाऊस टॅक्स आणि जिम, स्विमिंग पूल, पार्किंग, क्लब हाऊस इत्यादी सुविधा आणि त्यासाठीची रक्कम देखील तपासावी. तात्पर्य हेच करारावर फक्त तीच बिले नमूद करावीत, जी तुम्ही घरमालकाला द्याल.

रिपेअर आणि मेन्टेनन्सतुम्ही राहत असलेल्या घराची वेळोवेळी दुरुस्ती, देखभाल आणि रंगरंगोटी आवश्यक असते. अशा परिस्थितीत हा खर्च कोणाकडून केला जाणार आहे, हे करारावर स्पष्टपणे नमूद केलं पाहिजे. दुसरीकडे एखादी दुर्घटना घडली, तर अशावेळी घराच्या नुकसानीची भरपाई कोण देणार? ही गोष्ट करारावरही लिहिली पाहिजे.

याचीही घ्या काळजीया सर्वांशिवाय भाडे करारावर अनेक गोष्टी लिहिल्या असतात, त्या काळजीपूर्वक वाचा. घरात राहण्यापूर्वी तुम्ही घरमालकाला सिक्युरिटी देता, करारनाम्यावर नमूद केलेल्या सिक्युरिटी मनीचा उल्लेख त्यात करा आणि ते परत करण्यासंबंधीचे नियमही लिहा. यामुळे तुमच्या आणि घरमालकामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही. लक्षात ठेवा की करार हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील करार आहे, यामध्ये जर घरमालकानं त्याचे नियम लिहून ठेवले असतील तर तुम्ही तुमच्या गोष्टीही त्यात लिहून घेऊ शकता. स्वाक्षरी केल्यानंतर, भाडे कराराची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.

टॅग्स :सुंदर गृहनियोजन