National Highway Toll: जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबं आणि कार मालकांना सरकार लवकरच आणखी एक भेट देऊ शकते. सरकार वार्षिक टोल पास आणण्याच्या विचारात आहे. या पाससाठी तुम्हाला फक्त तीन हजार रुपये मोजावे लागतील. तर वर्षभर कोणत्याही अडथळ्याशिवाय राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करता येणारे. इतकंच नाही तर तुमच्याकडे लाइफटाइम पासचा पर्यायही असेल. यासाठी तुम्हाला एकावेळी ३० हजार रुपये मोजावे लागतील आणि १५ वर्ष टोल न भरता राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवता येईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक मंत्रालय या प्रस्तावावर गांभीर्यानं विचार करत आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलंय. खासगी गाड्यांसाठी प्रति किलोमीटर टोल दर बदलण्याचाही मंत्रालय विचार करत आहे. यामुळे महामार्ग वापरणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. तुम्हाला नवीन पास खरेदी करण्याची गरज भासणार नाही. हा पास तुमच्या फास्टॅगमध्येच जोडला जाईल.
वार्षिक पासचा पर्याय
सध्या केवळ मासिक पास उपलब्ध आहेत. हा पास दररोज एकाच टोल नाक्यावरून जाणाऱ्यांसाठी आहे. या पाससाठी तुम्हाला तुमचा पत्ता आणि इतर काही माहिती द्यावी लागते. या पासची किंमत दरमहा ३४० रुपये आहे. म्हणजेच वर्षभराचा खर्च ४,०८० रुपये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण एनएच नेटवर्कवर एका वर्षाच्या प्रवासासाठी ३ हजार रुपयांची ऑफर टोल प्लाझावरील विनामूल्य प्रवासाच्या सध्याच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे. ही पर्यायी सुविधा असेल. ती लोकांची पसंती ठरू शकते, असं सविस्तर विश्लेषणातून दिसून आलंय.
आपलं मंत्रालय कारमालकांना पास देण्याच्या योजनेवर काम करत आहे, असं यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. अनेक समस्यांवर उपाय म्हणून मंत्रालय याचा विचार करत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या समस्यांमध्ये शहराच्या हद्दीतील टोलनाक्यांबाबत वाढती नाराजी, ६० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील टोलनाके आणि टोलनाक्यांवर होणाऱ्या हिंसेचा समावेश आहे.
कसा होईल फायदा?
आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये एकूण ५५ हजार कोटी रुपयांच्या टोल महसुलात खासगी कारचा वाटा केवळ ८ हजार कोटी रुपये होता. टोल व्यवहार आणि वसुलीच्या आकडेवारीनुसार ५३ टक्के व्यवहार खासगी कारचे होते, पण टोल वसुलीत त्यांचा वाटा केवळ २१ टक्के होता. याशिवाय सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत टोलनाक्यांवर सुमारे ६० टक्के वाहतूक खासगी वाहनांची असते, तर व्यावसायिक वाहनांची वर्दळ दिवस-रात्र जवळपास सारखीच असते.
या पासमुळे काही वर्षांत उत्पन्नाचं नुकसान होणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, एनएचएआयला सुरुवातीला काही प्रमाणात महसूल गमवावा लागू शकतो. ही योजना सर्वसामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. यामुळे वेळेची बचत तर होईलच, शिवाय पुन्हा पुन्हा टोल भरण्याचा त्रासही दूर होईल. ही योजना किती काळ राबविली जाते आणि लोकांना त्याचा किती फायदा होतो हे पाहावं लागेल.