नवी दिल्ली: देशातील सर्व नागरिकांनी आपापले कर प्रामाणिकपणे भरले, तर सरकारला महसुलासाठी इंधनावरील करांवर कमी विसंबून राहावे लागेल आणि परिणामी जनतेला बसणारे इंधन दरवाढीचे चटके कमी होऊ शकतील, असे अर्थशास्त्र केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी मांडले.‘ढाचात्मक सुधारणा आणि वित्तीय शिस्तीने अर्थव्यवस्था व बाजाराला बळकटी येते,’ अशा लांबलचक शीर्षकाखाली जेटली यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. असे अर्थशास्त्र सांगत जेटली यांनी एकप्रकारे इंधनाचे दर कमी व्हावेत, यासाठी त्यावरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्याची शक्यता अप्रत्यक्षपणे फेटाळून लावली आहे. सर्वंकष उपाय न योजता, मध्येच धरसोड पद्धतीने इंधनावरील कर कमी केले, तर उलट त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असेही त्यांनी म्हटले.जेटली यांनी लिहिले की, नोकरदार वर्ग त्यांच्या वाट्याचे कर प्रामाणिकपणे चुकते करीत असतो, परंतु समाजातील बहुतांश अन्य वर्गांनी कर भरण्यात तत्परता दाखविली पाहिजे. सर्व नागरिक प्रामाणिकपणे कर भरत नसल्याने, भारतीय अर्थव्यवस्था करांची चोख वसुली होणारी अर्थव्यवस्था होऊ शकत नाही. त्यामुळे जनमतावर प्रभाव टाकू शकतात, असे राजकीय नेते व इतरांनी इंधनाखेरीज अन्य प्रकारच्या करांची चोरी बंद करण्यासाठी लोकांना उद्युक्त करावे. लोकांनी सर्वच प्रकारचे कर प्रामाणिकपणे भरले की, सरकारचे महसुलासाठी इंधनावरील करांवर विसंबून राहणे आपोआपच कमी होईल. हे होईपर्यंत मध्येच वित्तीय गणित बिघडविणे हानिकारक ठरेल.>चिदम्बरम यांना चिमटाइंधनावरील कर लीटरमागे २५ रुपयांनी कमी करायला हवा, असे माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी सुचविले होते. त्यावरून जेटली यांनी चिदम्बरम यांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला. त्यांनी लिहिले की, देश कर्जाच्या असह्य बोजाखाली दबला जावा या हेतूने सरकारला अडचणीत आणण्यासाठी केलेली ही सूचना आहे. माझ्या पूर्वसुरींनी स्वत: हे करण्याचे धाडस कधी दाखविले नाही. उलट त्यांच्या सरकारने मोठ्या कर्जाचा वारसा आमच्या हाती दिला.
प्रामाणिकपणे कर भरा; इंधनाचे चटके आपोआप होतील कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:50 AM