Join us

७२ तासांपेक्षा जास्त काळ केबल बंद राहिल्यास पैसे भरावे लागणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:28 AM

अनेकदा विविध कारणांमुळे केबलचे प्रक्षेपण बंद राहते. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण त्याचा फटका बसतो.

मुंबई : अनेकदा विविध कारणांमुळे केबलचे प्रक्षेपण बंद राहते. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण त्याचा फटका बसतो. मात्र ग्राहकांना चरफडत राहण्याशिवाय काही करता येत नाही. मात्र, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमांनुसार ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ७२ तासांपेक्षा जास्त कालावधीत केबल सलग बंद राहिल्यास त्यापुढील काळात केबल सुरू होईपर्यंतच्या कालावधीचे शुल्क भरावे लागणार नाही. ट्रायने याबाबत टिष्ट्वटरवरून माहिती दिली आहे.केबलच्या प्रसारणात व्यत्यय आल्यास त्याची तक्रार करण्यासाठी कॉल सेंटर असावे व तिथे त्याबाबत तक्रार नोंदवावी. मात्र, ७२ तास हा व्यत्यय कायम राहिल्यास व केबलचे प्रसारण बंद राहिल्यास त्यापुढील कालावधीत जोपर्यंत केबल सुरू होणार नाही तोपर्यंत केबलचे शुल्क भरावे लागणार नाही, असे सांगण्यात आले आहे.मुंबई ग्राहक पंचायतीच्या वर्षा राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, हा अत्यंत चांगला व ग्राहकांसाठी लाभदायक निर्णय आहे. याबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.ट्रायने अशा ग्राहकांभिमुख नियमांची प्रसिद्धी करून तळागाळातल्या जनतेपर्यंत अशा निर्णयाची माहिती पोहोचविण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली.