मुंबई : कंपनीची आर्थिक स्थिती दोलायमान झाल्यावर आणि कंपनीने दिवाळखोरीचा अर्ज केल्यानंतर गो-फर्स्ट कंपनीच्या अनेक वैमानिकांनी राजीनामा दिला होता. मात्र, कंपनी पुन्हा सुरू करतेवेळी वैमानिकांची चणचण भासू नये याकरिता गो-फर्स्ट कंपनीने आपल्या वैमानिकांना मासिक वेतनाखेरीज दरमहा १ लाख रुपये अधिकचे देण्याची घोषणा केली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना थांबविण्यासाठी आणि कंपनीची दिशा सांगण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना एक ई-मेल लिहिला आहे.
यानुसार, वैमानिकांना पगाराखेरीज प्रतिमहिना एक लाख रुपये देण्यात येणार आहेत, तर फर्स्ट ऑफिसर किंवा को-पायलटला पगाराखेरीज प्रति महिना ५० हजार रुपये देण्याचे कंपनीने सांगितले आहे. जे वैमानिक ३१ मे २०२३ पर्यंत कंपनीच्या सेवेत कार्यरत होते अशाच वैमानिकांसाठी ही योजना असून जे वैमानिक अथवा को-पायलट या सेवेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांना त्यांचा राजीनामा येत्या १५ जूनपर्यंत मागे घ्यावा लागेल, असे आवाहन कंपनीने केले आहे. याखेरीज कंपनीत अनेक वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष बोनसही देण्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
पुन्हा उड्डाणासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू
- दरम्यान, पुन्हा एकदा विमान उड्डाणासाठी कंपनी प्रयत्नशील असून डीजीसीएने कंपनीला या संदर्भात त्यांची योजना आणि तयारी किती आहे, याची माहिती कळवण्यास सांगितले आहे.
- याची माहिती लवकरच डीजीसीएला देण्यात येणार असून त्यांची अनुमती आल्यावर लवकरच विमानसेवा सुरू होणार असल्याचा उल्लेखदेखील कंपनीने कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये केल्याचे समजते.