Paytm Bhavesh Gupta : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर घातलेल्या निर्बंधानंतर Paytm कंपनी अडचणीत आली आहे. अनेक उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कंपनीला आणखी एक धक्का बसला आहे. कंपनीचे सीओओ आणि अध्यक्ष भावेश गुप्ता यांनीदेखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भावेश गुप्ता 31 मे रोजी आपले पद सोडतील.
वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा कंपनीने शनिवारी नियामक फायलिंगद्वारे भावेश गुप्ता यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. फायलिंगनुसार, भावेश गुप्ता यांनी एका पत्राद्वारे आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण पद सोडत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले. त्यांना करिअरमध्ये ब्रेक घ्यायचा आहे. मात्र, कंपनी सोडल्यानंतरही ते पेटीएमच्या मदतीसाठी नेहमी उपलब्ध असतील.
विजय शेखर शर्मा यांनी मानले आभार कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणाले की, आम्ही भावेश गुप्ता यांचे आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने मोठा प्रवास केला. आता पेटीएमला म्युच्युअल फंड आणि संपत्ती व्यवस्थापनाकडे नेण्याची वेळ आली आहे. कंपनी नवीन योजना तयार करत आहे. पेटीएम मनीचे सीईओ राकेश सिंह म्हणाले की, आम्हाला देशातील टॉप ब्रोकर्समध्ये स्थान निर्माण करायचे आहे.
पेटीएमचे तिमाही निकाल जाहीर होणारपेटीएमचे जानेवारी-मार्च तिमाहीचे निकाल लवकरच येत आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईचा विपरीत परिणाम या निकालांवर स्पष्टपणे दिसून येईल, असे मानले जात आहे. या कारवाईमुळे पेटीएमचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा ग्राहकवर्गही मोठा प्रमाणात कमी झाला आहे.