नवी दिल्ली - ‘पेटीएम’ची पालक कंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ने पुन्हा एकदा कर्मचारी कपात केली आहे. किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले, याची माहिती कंपनीने दिलेली नाही. एका वृत्तानुसार, जानेवारी-मार्च २०२४च्या तिमाहीत पेटीएमच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३,५००ने घटून ३६,५२१ झाली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सेवेवर प्रतिबंध घातल्यामुळे ही घट झाली होती. आता कंपनीने सोमवारी पुन्हा एक निवेदन जारी करून कर्मचारी कपातीची घोषणा केली.
कामावरून काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना ‘आऊटप्लेसमेंट’साठी मदत केली जात आहे. यासाठी ३० कंपन्यांशी मनुष्यबळ विकास विभागाने संपर्क साधला आहे, असे ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ने म्हटले आहे.