'म्युच्युअल फंड सही है' म्हणत बरेच जण गुंतवणुकीच्या या नव्या पर्यायाकडे वळले असले, तरी पूर्वापार चालत आलेल्या 'फिक्स डिपॉझिट' अर्थात मुदत ठेवींवर बहुतांश मध्यमवर्गीयांचा आजही विश्वास आहे. परंतु, बऱ्याच बँकांमध्ये एफडीवर मिळणारं व्याज जेमतेम सहा टक्क्यांवर आलंय. एफडी मोडली तर त्याचं शुल्क कापलं जातं ते वेगळंच. तरीही, बरेच जण आवर्जून एफडी करतात आणि बचत खात्यापेक्षा थोडं अधिक व्याज मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा मंडळींसाठी पेटीएम पेमेंट्स बँकेनं नवी सुविधा सुरू केलीय.
पेटीएम पेमेंट्स बँकेने एफडीवर आठ टक्के व्याज देण्याचं जाहीर केलंय. त्यासोबतच, एफडी मोडावी लागली, तर खात्यात ठेवलेले पैसे निःशुल्क काढण्याची सुविधाही ते देत आहेत. सुरक्षित गुंतवणुकीला चालना देण्याचा त्यामागे उद्देश आहे.
वास्तविक, पेटीएम ही पेमेंट्स बँक असल्यानं ते ग्राहकांना एफडीची सेवा देऊ शकत नाहीत. परंतु, ही सुविधा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला करार पेटीएमनं इंडसइंड बँकेसोबत केला आहे. त्यामुळे आता पेटीएम पेमेंट्स बँक आपल्या वतीने इंडसइंड बँकेत एफडी खातं उघडते.
पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात एक लाख रुपयांपेक्षा जेवढी अधिक रक्कम असेल, ती सुरुवातीला १३ महिन्यांसाठी 'फिक्स्ड' केली जाईल. ही मुदत पूर्ण झाल्यावर आपल्याला आठ टक्के दराने व्याज मिळेल, तसंच मुदत वाढवायची असल्यास तो पर्यायही दिला जाईल. काही कारणास्तव एफडी मोडावी लागल्यास कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही, असंही पेटीएमनं स्पष्ट केलंय. अगदीच सात दिवसांत तुम्ही पैसे काढून घेतले, तर मात्र व्याज लागू होणार नाही.
पेटीएम बँकेसोबत स्वतंत्र एफडी सुरू करायची असेल तर ती सोय अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे आत्ता तरी या नव्या योजनेला फायदा ठरावीक ग्राहकांनाच घेता येणार आहे.