देशातील सर्वात मोठा डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम (Paytm) ची पॅरेंट कंपनी One 97 Communications आज शेअर बाजारात लिस्ट झाली. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ आहे. मात्र, पेटीएम फुसका बार निघाला असून मोठ्या कमाईची वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांना तगडा झटका बसला आहे.
एकतर आधीच शेअर 9 टक्क्यांच्या डिस्काऊंटने शेअर बाजारात लिस्ट झाला. परंतू लिस्ट झाल्या झाल्याच पेटीएमचा शेअर गडगडला. बीएसईवर हा शेअर 1955 रुपयांनी लिस्ट करण्यात आला. याचा इश्यू प्राईज 2150 रुपये होती. यामुळे लिस्ट होतानाच गुंतवणूकदारांना 195 रुपयांचे नुकसान झाले. यानंतर शेअर 20 टक्क्यांनी गडडला. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये शेअर 1705.55 रुपयांपर्यंत कोसळला होता.
पेटीएम ही या वर्षी लिस्ट होणारी 49 वी कंपनी आहे. पेटीएमचा आयपीओ देशातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ (IPO) आहे. 18,300 कोटींच्या या आयपीओला अपेक्षेनुसार प्रतिसाद मिळाला नाही. याला एकूण 1.89 पटींनी बोली मिळाल्या होत्या. हा 8 नोव्हेंबरला खुला झाला होता. 10 नोव्हेंबरला बंद झाला. क्यूआयबी कॅटेगरीमध्ये 2.79 पटींनी आणि रिटेल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीमध्ये 1.66 पटींनी जास्त बोली लागली होती.
Retail investor who got Paytm IPO, after seeing the listing price#paytmlisting#StockMarketindiapic.twitter.com/DUCmQfrFOq
— शिशिर गिरजापुरकर (@DBhishimpitama) November 18, 2021
Macquarie केलेले भाकित...
ग्रे मार्केटमध्ये 7 नोव्हेंबरला हा शेअर 2,300 रुपयांवर ट्रेंड करत होता. ही किंमत इश्यू प्राईजपेक्षा 150 रुपयांनी जास्त आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म Macquarie ने पेटीएमची कंपनी One 97 Communications वर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. या फर्मने ही कंपनी अंडरपरफॉर्म असल्याचे रेटिंग दिले होते. Macquarie ने तर शेअर टार्गेट प्राईज 1200 रुपये ठेवले आहे. जे इश्यू प्राईसपेक्षा 44 टक्क्यांनी कमी आहे. पेटीएमच्या बिझनेस मॉडेलमध्ये फोकस आणि डायरेक्शनची कमी आहे, असे म्हणत पेटीएम मॉडेल हे लोकांचे पैसे उद्ध्वस्त करणारे आहे, असे म्हटले होते.