पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी One 97 कम्युनिकेशननं १ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. यामध्ये कंपनीच्या निरनिराळ्या युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कंपनी आपल्या इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कॉस्ट कटिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी कपातीची ही फेरी सुरू आहे. दरम्यान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा व्यापक वापर आणि कर्मचाऱ्यांचा खराब परफॉर्मन्स हे यामागील कारण असल्याचं कंपनीनं म्हटलंय.एआयच्या वापरामुळे कंपनीची क्षमता अधिक वाढवली जाऊ शकते. हे लागू केल्यानं ऑपरेशन्स, सेल्स आणि इंजिनिअरिंग टीमच्या १ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत आहे. कंपनी जवळपास १ महिन्यापासून आपल्या कामकाजात बदल करत असल्याचं पेटीएमनं म्हटलं. याशिवाय कंपनीनं आपल्या स्मॉल-तिकीट कंझ्युमर लँडिंग आणि 'बाय नाऊ पे लेटर' सुविधेमध्येही बदल केले आहेत. असुरक्षित कर्जावरील आरबीआयच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हे देखील करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता लहान कर्ज देणं बंद करणार असल्याचं कंपनीनं यापूर्वी सांगितलं होतं. म्हणजेच आता मोठी कर्जे देण्यावरच काम केलं जाणार आहे.काय म्हटलं कंपनीनं?आम्ही ऑपरेशन्सना Ai शी निगडीत तंत्रज्ञानानं पुढे नेण्याची तयारी करत आहोत. या माध्यमातून क्षमता वाढवण्यात येणार आहे. याच्या मदतीनं खर्च कमी करणं आणि वाढीमध्ये तेजी आणली जाऊ शकते. एआयच्या वापरानं केवळ आमचं कामकाजच जलद होणार नाही, तर १० ते १५ टक्के कर्मचाऱ्यांची संख्याही कमी केली जाऊ शकते. तंत्रज्ञानातील प्रगतीच्या सोबतच आम्ही वर्षभरात चांगली कामगिरी न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचाही प्लॅन तयार केला आहे, असं पेटीएमच्या प्रवक्त्यानं सांगितलं.नव्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत आमच्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक खर्च इन्शुरन्स आणि वेल्थ क्षेत्रात होत आहे. आमचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी आम्ही लोन मॉडेल आणखी मजबूत करण्यावर भर देत आहोत. नवीन व्यवसायाचा विस्तार करण्याची आमची योजना असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं. यापूर्वी २०२१ मध्ये देखील पेटीएमने ५०० ते ७०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.
Paytm Layoff: AI चा परिणाम भारतातही दिसू लागला! 'पेटीएम'मधील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 9:43 AM