नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ई-कॉमर्स कंपनी पेटीएम मॉल आणि स्नॅपडीलला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मानकांशिवाय प्रेशर कुकर विकल्याबद्दल दंड आकारून CCPA ने दोन्ही कंपन्यांना विकलेला माल मागे घेण्याचे तसेच ग्राहकांनी भरलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.
CCPA ने दोन वेगळ्या ऑर्डरमध्ये पेटीएम ईकॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड (पेटीएम मॉल) आणि स्नॅपडील प्रायव्हेट लिमिटेड यांना खराब प्रेशर कुकर विकल्याबद्दल दोषी ठरवले. हे प्रेशर कुकर भारतीय मानक ब्युरो (BIS) मानकांनुसार नाहीत आणि डोमेस्टिक प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) ऑर्डर-2020 (QCO) चे पालन करत नसल्याचे आढळून आले.
पेटीएम मॉलने प्रिस्टिन आणि क्यूबन प्रेशर कुकर त्याच्या प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी ठेवले होते, तर उत्पादन वर्णन स्पष्टपणे नमूद केले आहे की त्यात आयएसआय मार्क नाही. CCPA ने 25 मार्च रोजीच्या आपल्या आदेशात पेटीएम मॉलला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विकल्या गेलेल्या 39 प्रेशर कुकरच्या सर्व ग्राहकांना माहिती देण्यास, प्रेशर कुकर मागे घेण्यास आणि त्यांच्या किमती ग्राहकांना परत करण्यास सांगितले आहे. याशिवाय यासंदर्भातील अनुपालन अहवाल 45 दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे.
25 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, CCPA ने असे म्हटले आहे की पेटीएम मॉलने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विकलेले असे सर्व प्रेशर कुकर परत मागवावे लागतील आणि ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावे लागतील. दुसरीकडे, Snapdeal वर लिस्टेड सरांश एंटरप्रायझेस आणि एजेड सेलर्सचे प्रेशर कुकर नियम पूर्ण करत नव्हते. स्नॅपडीलला आपल्या प्लॅटफॉर्मवर विकले गेलेले 73 प्रेशर कुकर परत मागवावे लागतील आणि ग्राहकांना त्यांचे पैसे परत करावे लागतील.