Join us

घसरत्या बाजारातही Paytm च्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, ३ दिवसांपासून अपर सर्किट; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 4:16 PM

पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये मंगळवारी पुन्हा एकदा जबरदस्त वाढ झाली.

Paytm share price: पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये मंगळवारी पुन्हा एकदा जबरदस्त वाढ झाली. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी या शेअरला पुन्हा एकदा 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. हा सलग तिसरा दिवस आहे जेव्हा पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे. पेटीएमला NPCI नं UPI सिस्टीममध्ये सामील होण्यासाठी मान्यता दिली आहे. यानंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत आहे. 

सोमवारी पेटीएमचा शेअर 389.40 रुपयांवर बंद झाला होता. मंगळवारी ट्रेडिंगदरम्यान यात 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागून हा शेअर 408.85 रुपयांवर पोहोचला. 20 ऑक्टोबर 2023 रोजी या शेअरची किंमत 998.30 रुपये होती. हा या शेअरचा 52 आठवड्याचा उच्चांकी स्तर आहे. 

तेजीचं कारण काय? 

पेटीएमची मालकी असलेल्या One97 कम्युनिकेशन्स लिमिटेडला मल्टी-बँक मॉडेल अंतर्गत थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर (TPAP) म्हणून UPI ​​सिस्टीममध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) म्हटले आहे की ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक पेटीएमसाठी पेमेंट सिस्टम प्रोव्हायडर (PSP) बँका म्हणून काम करतील.  

ब्रोकरेजचं मत काय? 

ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीनं पेटीएम शेअर्सची टार्गेट प्राईज ₹ 555 ठेवली आहे. देशांतर्गत ब्रोकिंग फर्म येस सिक्युरिटीजने पेटीएम स्टॉक कव्हर करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रथमच त्याला अपग्रेड केलं आहे. यापूर्वी अनेक कारणांमुळे रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादले होते. यानंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजार