Paytm share price: फिनटेक कंपनी पेटीएमच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता पेटीएमवर क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीनं या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं असलं तरी या बातमीमुळे शुक्रवारी पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
शेअरची स्थिती काय?
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पेटीएमच्या शेअरची किंमत ८ टक्क्यांहून अधिक घसरली. व्यवहारादरम्यान हा शेअर ८.८४ टक्क्यांनी घसरून ७७३.९० रुपयांवर आला. व्यवहाराअंती शेअरचा भाव ८०७.७५ रुपयांवर आला. यात ४.८५ टक्क्यांची घसरण झाली. डिसेंबर २०२४ मध्ये हा शेअर १,०६३ रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. तर मे २०२४ मध्ये शेअरचा नीचांकी स्तर ३१० रुपये होता.
काय आहे प्रकरण?
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, फिनटेक कंपनी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स ही ईडीकडून चौकशी सुरू असलेल्या आठ पेमेंट गेटवेपैकी एक आहे. हे असं पेमेंट गेटवे आहेत ज्यांनी गेल्या दोन वर्षांत त्यांच्या व्हर्च्युअल सुमारे ५०० कोटी रुपये जमा केले आहेत. एचपीझेड टोकन अॅपच्या माध्यमातून १० चिनी नागरिकांनी केलेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीनं क्रिप्टोकरन्सी मायनिंगमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन २२०० कोटींहून अधिक रक्कम गोळा केल्याचा आरोप आहे. या रकमेचा काही भाग परदेशात पाठविण्यात आला होता, तर सुमारे ५०० कोटी रुपये लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यापूर्वी या पेमेंट गेटवेच्या व्हर्च्युअल खात्यात जमा करण्यात आले होते.
कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, पेटीएमने शेअर बाजारांवर स्पष्टीकरण जारी करत कंपनीला सक्तवसुली संचालनालयाकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही आणि प्रसारमाध्यमांनी सांगितलेली प्रकरणं थर्ड पार्टी व्यापाऱ्यांशी संबंधित अशाच जुन्या चौकशीशी संबंधित असल्याचं म्हटलं. सक्तवसुली संचालनालयाकडून आम्हाला अशी कोणतीही नवी नोटीस मिळालेली नाही, याची आम्ही पुष्टी करू शकतो. ही माहिती तथ्यात्मकदृष्ट्या चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचंही त्यांनी म्हटलं.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)