Join us

PayTM देतेय FD वर दमदार व्याज; केवळ १०० रुपयांपासून करू शकता गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 4:58 PM

PayTM: PayTM बँक ग्राहकांसाठी मुदत ठेव म्हणजे Fixed Deposit अकाऊंट सुविधा सुरू केली आहे.

नवी दिल्ली: डिजिटल व्यवहारांमध्ये सर्वांत आघाडीवर असलेल्या PayTM ने आपल्या बँकिंग सेवांचा विस्तार केल्याचे पाहायला मिळत आहे. यानुसार आता PayTM बँक ग्राहकांसाठी मुदत ठेव म्हणजे Fixed Deposit अकाऊंट सुविधा सुरू केली आहे. केवळ १०० रुपये भरून PayTM बँकेचे एफडी खाते सुरू करता येणार आहे. (paytm payments bank starts fixed  deposit scheme at 100 rupees)

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने ग्राहकांसाठी नवीन मुदत ठेव योजना सुरू केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेने इंडसइंड बँकेच्या सहकार्याने पेटीएम ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणली आहे. विशेष म्हणजे तुम्ही काही महिन्यानंतर एफडी ब्रेक केली तर तुमच्याकडून कोणताही अतिरिक्त दंड आकारला जात नाही.

किती मिळणार व्याज?

पेटीएम पेमेंट्स बँकने यासंदर्भात एक ट्विट केलं असून, माहिती दिली आहे. या योजनेची सविस्तर माहिती ग्राहकांना संकेतस्थळावरही पाहता येईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट्स बँकेचे परवाना आणि ऑपरेटिंग दिशानिर्देशांनुसार, कोणत्याही पेटीएम ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये दिवसअखेरपर्यंत एकूण शिल्लक ही दोन लाखांहून अधिक असू नये. या संमतीच्या आधारावरच पेटीएम पेमेंट्स बँकेने इंडसइंड बँक लिमिटेडसह भागीदारीने एफडीची सुविधा सुरू केली आहे. याचाच अर्थ दोन लाख रुपयांपर्यंत ग्राहक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यासाठी पेटीएम पेमेंट्स बँक एफडीवर ५.५ टक्के व्याज देणार आहे. 

Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार

पासबुकची सुविधादेखील उपलब्ध 

पेटीएम पेमेंट्स बँक फिक्स्ड डिपॉझिटची मॅच्युरिटी ३६५ दिवसांसाठी आहे. या मॅच्युरिटीवरील व्याज ६ टक्के आहे. यात पासबुकची सुविधाही देण्यात आली आहे. ग्राहकांना अधिक व्याज देणारी मुदतपूर्ती कालावधीसह एफडी बुक करता येणार आहे. तुम्ही कधीही तुमची एफडी रिडीम करु शकता. मात्र रिडीम केल्यानंतर तुमच्या मूळ रक्कमेवरील व्याजातून टीडीएस कपात केला जाईल. त्यानंतर शिल्लक रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. एखादी एफडी मुदतीपूर्व बंद केली, तर एफडीवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. एफडीचे दर आणि कालावधी हा पेटीएम पेमेंट्स बँकेमार्फत कळविला जाईल, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :पे-टीएमबँक