Join us  

Paytm Q2 Result : पेटीएमला झाला ९३० कोटी रुपयांचा नफा; तरी का ८% आपटले शेअर्स? कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 2:14 PM

Paytm Q2 Result: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सनं मंगळवारी तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीनं लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच एका तिमाहीत नफा कमावला आहे

Paytm Q2 Result: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सनं (One 97 Communications) मंगळवारी तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीनं लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच एका तिमाहीत नफा कमावला आहे. पेटीएमनं जाहीर केलेल्या निकालानुसार जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत त्यांना एकूण ९३० कोटी रुपयांचा नफा झालाय. कंपनीच्या नफ्यामागचं प्रमुख कारण म्हणजे एन्टरटन्मेंट तिकीट व्यवसायाची विक्री. झोमॅटोनं त्यांची ही कंपनी विकत घेतली आहे. हा व्यवसाय विकून पेटीएमला १३४५ कोटी रुपये मिळाले आहेत. या तिमाही निकालानंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

गुंतवणूकदार निराश

पेटीएमच्या दुसऱ्या तिमाहीच्या कामगिरीवर गुंतवणूकदार निराश दिसत आहेत. सोमवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ७२५.८५ रुपयांवर बंद झाला. आज कंपनीचा शेअर तेजीसह ७२८ रुपयांवर उघडला. पण त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. कामकाजादरम्यान बीएसईवर हा शेअर ८ टक्क्यांहून अधिक घसरून ६६९.६५ रुपयांवर आला होता. त्यानंतर त्यात थोडी रिकव्हरी दिसून आली.

वार्षिक आधारावर महसुलात घट

पेटीएमनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण महसूल १६६० कोटी रुपये होता. ज्यात वार्षिक आधारावर ३४ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल २५१९ रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत कंपनीची ग्रॉस मर्चेंडाइज व्हॅल्यू (जीएमव्ही) ५ टक्क्यांनी वाढली आहे. सणासुदीच्या काळात कंपनीचा जीएमपी वाढतच राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कामगिरीत सुधारणा

तिमाही आधारावर निव्वळ पेमेंट मार्जिनमध्ये २१ टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या वित्तीय सेवांच्या महसुलात ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चालू तिमाहीत कंपनीच्या महसुलात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पे-टीएमशेअर बाजार