Paytm ब्रँड अंतर्गत कार्यरत असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स (One97 Communications) या डिजिटल वित्तीय सेवा फर्मला पुन्हा एकदा तोटा सहन करावा लागला आहे. मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा 761.4 कोटी रुपयांचा तोटा झाला. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 441.8 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
One97 Communications ने डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 778.4 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. तर दुसरीकडे सप्टेंबर 2023 पर्यंत ऑपरेशनल ब्रेकइव्हन साध्य करतील असा विश्वास पेटीएमने व्यक्त केला आहे. त्याच वेळी, कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न जवळपास 89 टक्क्यांनी वाढून समीक्षाधीन तिमाहीत 1,540.9 कोटी रुपये झाले आहे. हे मागील वर्षीच्या याच कालावधीत 815.3 कोटी रुपये होते.
शुक्रवारी पेटीएमच्या शेअरची किंमत 575.35 रुपये होती. गुरूवारच्या तुलनेत शेअरच्या किंमतीत 3.90 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये याचा आयपीओ लॉन्च करण्यात आला होता. त्याच वेळी, पेटीएमची इश्यू प्राईज 2150 रुपये होती. यानुसार पाहिलं तर गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1575 रुपयांचा तोटा झाला आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये 6 शेअर्स होते.