Join us

Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:41 AM

Paytm Q4 Results: पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सने बुधवारी, २२ मे रोजी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा सुमारे साडेतीन पटीनं वाढून ५५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सने बुधवारी, २२ मे रोजी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा सुमारे साडेतीन पटीनं वाढून ५५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर, कंपनीच्या महसुलातही या काळात सुमारे २.९ टक्क्यांनी घट झाली असून गेल्या वर्षीच्या २,३३४ कोटी रुपयांच्या तुलनेत महसूल २२६७.१० कोटी रुपये झालाय. तिमाही आधारावर कंपनीच्या महसुलात २० टक्क्यांनी घट झाली आहे. 

रिझर्व्ह बँकेनं पेटीएमची उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे मार्च तिमाहीत त्यांच्या मार्जिनवर परिणाम झाला. कंपनीच्या नफ्यात घट होण्याचे हे मुख्य कारण होतं. 

काय म्हटलंय कंपनीनं? 

२०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा ५४९.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पेटीएमच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत निव्वळ तोटा २१९.६ कोटी रुपये होता. कंपनीच्या ESOP पूर्वीचं व्याज, कर, डेप्रिसिएशन आणि Ebitda पूर्वी कंपनीची कमाई मार्च तिमाहीत तेजीनं घसरुन १०३ कोटी रुपये झाली. गेल्या वर्षी समान कालावधीत ही  २३४ कोटी रुपये होती. 

शेअर आपटला 

पेटीएमने जाहीर केलेल्या तोट्याच्या निकालांचा तात्काळ परिणाम पेटीएम शेअरवर दिसून आला. पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन स्टॉकच्या शेअरमध्ये जवळपास २ टक्क्यांची घसरण झाली. सकाळी ९.१५ वाजता बाजार उघडताच पेटीएमचा शेअर घसरणीसह ३५५.६० रुपयांच्या पातळीवर उघडला आणि काही वेळात तो ३४६ रुपयांवर आला.

टॅग्स :पे-टीएमभारतीय रिझर्व्ह बँक