Paytm Share Price Today: सेबीकडून वॉर्निंग लेटर मिळाल्यानंतर पेटीएमचा शेअर आज जवळपास दोन टक्क्यांनी घसरला आहे. एनएसईवर सुरुवातीच्या व्यवहारात पेटीएमचा शेअर १.७७ टक्क्यांनी घसरून ४६१ रुपयांवर आला. पेटीएमचा शेअर आज सकाळी ४६६ रुपयांवर उघडला आणि ४७१.४० रुपयांवर पोहोचला आणि दिवसाच्या नीचांकी पातळीवर ४५५.९५ रुपयांवर पोहोचला. नंतर त्यात थोडी तेजी दिसून येत होती.
फिनटेक कंपनी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सला २०२२ या आर्थिक वर्षासाठी पेटीएम पेमेंट्स बँकेसोबत कंपनी किंवा तिच्या उपकंपन्यांनी केलेल्या रिलेटेड पार्टी ट्रान्झॅक्शनच्या संबंधित व्यवहारांबाबत सेबीकडून अॅडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्निंग लेटर मिळालं आहे.
सेबीनं का दिलं वॉर्निंग लेटर?
सेबीला तपासादरम्यान अनेक नियमांचं पालन होत नसल्याचं आढळलं आणि म्हटलं की वन९७ कम्युनिकेशन्सनं पेटीएम पेमेंट्स बँकेशी ३६० कोटी रुपयांच्या मंजूर मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भविष्यात सावधगिरी बाळगावी आणि आपल्या मानकांमध्ये सुधारणा करावी, असं सेबीनं पेटीएमला पाठवलेल्या वॉर्निंग लेटरमध्ये म्हटलं आहे. तसं न केल्यास कायद्यानुसार एन्फोर्समेंट कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
कंपनीनं काय म्हटलं?
"वेळोवेळी सर्व लिस्टिंग नियमांचं कंपनीनं पालन केलं आहे. कंपनी हायएस्ट कम्प्लायन्स स्टँडर्ड कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. कंपनीनं कायच सेबीच्या नियमांनुसार काम केलंय. या वॉर्निंग लेटरमुळे कंपनीच्या आर्थिक, परिचालन आणि अन्य कोणत्याही कामाकाजावर परिणाम होणार नाही," असं पेटीएमनं म्हटलंय.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)