Paytm Share: जपानमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकदार सॉफ्टबँक ग्रुपने सलग दुसऱ्या वर्षात तोटा नोंदवला आहे. कंपनीला मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात ९७० अब्ज येनचा (७ अब्ज डॉलर) तोटा झाला आहे. याच सॉफ्टबँकेने भांडवली बाजार नियामक सेबीच्या अधिग्रहणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्समधील २ टक्क्यांहून अधिक समभागांची विक्री केली आहे. त्यामुळे पेटीएमचे शेअर पुन्हा एकदा कोसळले आहेत.
सॉफ्टबँकेकडून सॉफ्टबँक व्हिजन फंडामार्फत तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक केली जाते. सॉफ्टबँकेला मागील आर्थिक वर्षात १.७ लाख कोटी येनचा (१३ अब्ज डॉलर) तोटा झाला होता. जगभरातील भांडवली बाजारांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग गडगडले आहेत. याचा परिणाम होऊन कंपनीला मोठा तोटा झाला आहे. सॉफ्टबँकेची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. अमेरिकेतील बँकिंग संकट आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्यामुळे जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चिततेचे वारे आहे. यामुळे सॉफ्टबँकेने गुंतवणूक केलेल्या कंपन्यांच्या समभागात घसरण होऊन फटका बसला आहे.
सॉफ्टबँकेकडून पेटीएममधील २ टक्के हिस्साविक्री
बाजार मंचाने दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टबँकेची कंपनी असणाऱ्या एसव्हीएफ इंडिया होल्डिंग्ज (केमन) लिमिटेडने १० फेब्रुवारी २०२३ आणि ८ मे २०२३ दरम्यान वन९७ कम्युनिकेशन्समधील १,३१,०३,१४८ शेअर्स विकले आहेत, जे एकूण समभागसंख्येच्या अंदाजे २.०७ टक्के होते. हा व्यवहार सुमारे ९८५ कोटी रुपयांना पार पडला. यांनतर सॉफ्टबँकेची पेटीएममध्ये सुमारे ११.१७ हिस्सेदारी राहिली. म्हणजेच सुमारे ७,०८,०९,०८२ समभाग कंपनीचे आहेत. सॉफ्टबँकेने याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये वन९७ कम्युनिकेशन्समधील ४.५ टक्के हिस्सेदारी सुमारे १,६२७ कोटी रुपयांना विकली होती. सॉफ्टबँकेने २०१७ मधील अखेरच्या तिमाहीत पेटीएममध्ये १.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती.
दरम्यान, सेबीच्या अधिग्रहणासंबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी वन९७ कम्युनिकेशन्समधील अँट समूहदेखील समभाग विक्री करण्याची शक्यता आहे. मुंबई शेअर बाजारात पेटीएमचा समभाग २.७४ टक्क्यांच्या म्हणजेच १९.८० रुपयांच्या घसरणीसह ७०७.८० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअर बाजारातील समभागांच्या किमतीनुसार कंपनीचे ४४,८७० कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.