Paytm Share Price: पेटीएमच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात गुरुवारी आणि शुक्रवारी शेअरला अपर सर्किट लागलं. शुक्रवारी अपर सर्किटनंतर बीएसईमध्ये कंपनीचा शेअर ३४९.९५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गेल्या २ दिवसांत पेटीएमच्या शेअरच्या किंमतीत १३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
पेटीएमच्या शेअर्समध्ये (Paytm Share Price) वाढ होण्यामागे काही रिपोर्ट्स कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. आदित्य बिर्ला फायनान्स आणि इतर काही कंपन्यांनी पेटीएमच्या लोन गॅरंटीचा वापर केल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. मात्र, पेटीएमनं हे वृत्त फेटाळून लावलं.
"आमच्या कर्जदात्यांद्वारे लोन गॅरेंटी लागू करण्याचे दावे चुकीचे आहेत. आमचा वैयक्तिक कर्ज वाटपाचा व्यवसाय विनाअडथळा सुरळीत सुरू आहे,” असं पेटीएमनं जारी निवेदनात सांगितलं.
९ मे रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर
शुक्रवारी पेटीएमच्या शेअरची किंमत ३४० रुपयांच्या पातळीवर उघडली. काही काळानंतर कंपनीच्या शेअरची किंमत ३४९.९५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली. याआधी ९ मे रोजी पेटीएमचा शेअर कामकाजादरम्यान ३१० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. ही कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे. पेटीएमचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ९९८.३० रुपये प्रति शेअर आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ?
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार प्रवेश गौर (सीनिअर टेक्निकल अॅनालिस्ट) म्हणाले, "पेटीएमचे शेअर्स गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. पेटीएम सध्या ३०५ ते ३७० रुपयांच्या झोनमध्ये व्यवहार करत आहे. जर हा शेअर ३७० रुपयांच्या वर जाण्यात यशस्वी झाला तर तो ४०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो."
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)