Join us

Paytmची बँकांहून जास्त नफा देणारी योजना, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 8:47 PM

आता पेटीएमनं म्युचुअल फंडाची अनोखी योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

नवी दिल्ली- मोबाइल वॉलेटमध्ये पेटीएम हे सध्या आघाडीवर आहे. कॅशबॅक आणि इतर बिल भरणा करण्यासाठी पेटीएसचा सर्रास वापर केला जातोय. त्यामुळे अल्पावधीत पेटीएम ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालं आहे. त्यात आता पेटीएमनं म्युचुअल फंडाची अनोखी योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. पेटीएमनं पेटीएम मनी हे अॅप लाँच केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही पेटीएमच्या म्युचुअल फंडात 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.म्युचुअल फंडाच्या 100 रुपयांच्या एसआयपी(सिस्टेमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लान)मध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी पेटीएमनं 25 म्युचुअल फंड पुरवणा-या कंपन्यांबरोबर करार केला आहे. बँकेत एफडी करायची असल्यास तुम्हाला 7 ते 9 टक्क्यांच्या व्याजाच्या स्वरूपात परतावा मिळतो. तोच म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला 15 टक्के वर्षाला परतावा मिळतो. परंतु म्युचुअल फंडातून मिळालेला परतावा हा शेअर बाजारावर अवलंबून असतो. पेटीएम मनीच्या माध्यमातून गुंतवणूकदार आपल्या स्मार्टफोनद्वारे म्युच्युअल फंडची खरेदी आणि विक्री करू शकतात. आजपासूनच गुंतवणूकदार हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकतील. पेटीएम मनीमध्ये 25 मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांचे विविध प्लॅन्स उपलब्ध आहेत.काय आहे पेटीएम मनी ?पेटीएम मनी हे तुम्हाला म्युचुअल फंडात गुंतवणूक करण्याचं माध्यम उपलब्ध करून देते. पेटीएमचं 3 ते 5 वर्षं 2.5 कोटी ग्राहकांना जोडण्याचा उद्देश आहे. आतापर्यंत या अॅपवर 8.5 लाख लोकांनी नोंदणी केली आहे. पेटीएम मनी अॅपच्या माध्यमातून डिजिटल केवायसीही होणार आहे. काय असते म्युचुअल फंड ?म्युचुअल फंड कंपन्यांना गुंतवणूकदारांकडून पैसे जमा करतात. हा जमा केलेला पैसा कंपन्या शेअर बाजारात गुंतवतात. यासाठी गुंतवणूकदारांकडून काही शुल्कही घेतलं जातं. ज्यांना शेअर बाजारासंदर्भात जास्त माहिती नाही, त्यांच्यासाठी म्युचुअल फंडाची गुंतवणूक हा फायदेशीर पर्याय आहे. गुंतवणूकदारही गुंतवणुकीच्या टप्प्यानुसार म्युचुअल फंडातल्या योजनेची निवड करू शकतात. पेटीएम मनी हा वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडचा चौथा उपभोक्ता ब्रॅंड असून तिचे मुख्यालय भारताची टेक राजधानी बंगळूर येथे आहे. ही स्वतंत्र व्यापार संस्था गुंतवणूक उभारण्यावर आणि संपत्ती व्यवस्थापन उत्पादने आणि सेवा यावर लक्ष केन्द्रित करेल. येत्या काही आठवड्यात कंपनी 2500 पेक्षा जास्त युझर्सना दररोज अॅक्सेस देईल आणि येत्या काही आठवड्यांत त्याचे प्रमाण दररोज 10000+ इतके वाढवेल. युझर्सना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर या अॅक्सेसबद्दल कळवण्यात येईल. पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, “आजवर संपत्ती निर्मितीच्या संधी खूप कमी लोकांपर्यंत पोहोचल्या होत्या. पेटीएम मनीच्या मदतीने आम्ही लोकशाहीकरण करून लाखो भारतीयांपर्यंत म्युच्युअल फंड गुंतवणूक पोहोचवू इच्छित आहोत. येत्या 5 वर्षात भारतातील गुंतवणूकदारांचा बेस 50 मिलियनपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या उद्योगात गुंतवणूकदारांची संख्या वाढवण्यात पेटीएम मनी साहाय्यकाचे काम करेल अशी आमची अपेक्षा आहे.”पेटीएम मनीचे पूर्ण वेळ संचालक प्रवीण जाधव म्हणाले, “आम्हाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने आम्ही खरोखर नतमस्तक झालो आहोत. पेटीएम मनीच्या मदतीने लाखो गुंतवणूकदारांना भारताच्या विश्वासार्ह एएमसीज आणि फंड व्यवस्थापकांशी जोडणे आणि त्याच वेळी गुंतवणूक प्रक्रिया सर्वांसाठी सुलभ, पारदर्शक व उपलब्ध करणे व गुंतवणूकदारांना ती विनामूल्य प्रदान करणेही आमची भूमिका आहे. आम्ही एक तंत्रज्ञान आधारित मंच उभारत आहोत जो गुंतवणुकीचे मार्गदर्शन आणि एक्झिक्युशन सेवा हे दोन्ही देतो, तपशीलवार रिस्क प्रोफायलिंग पूर्ण करतो आणि गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी युझर्सना सर्व संभव माहिती पुरवतो.”

टॅग्स :पे-टीएम