Paytm च्या शेअर्सच्या किंमतीत (Paytm Share Price) अद्यापही घसरण सुरूच आहे. बुधवारी शेअर बाजारात पेटीएमच्या शेअर्सची विक्रीच अधिक होत असल्याचं दिसून आलं. सकाळी ११२४ रुपयांवर पेटीएमचा स्टॉक (Paytm Stock) खुला झाला. तसंच कामाकाजादरम्यान, तो १०७५ रुपयांपर्यंत खाली आला. अखेरच्या सत्रात पेटीएमचा शेअर ३.४१ टक्क्यांनी घसरून १०८१.४५ रुपयांवर बंद झाला.
बुधवारी शेअर बाजाराचा निर्देशांक ५३३.१५ अंकांनी वधारून ६११५०.०४ रूपयांवर बंद झाला. ज्या लोकांनी पेटीएमच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील किंवा ज्यांना आयपीओमध्ये शेअर्स अलॉट झाले असतील त्यांना दोनच महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या शेअरची किंमत जळपास अर्ध्यापर्यंत येईल असं वाटलंही नसेल. किरकोळ गुंतवणूकदारांना यामध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे.
Paytm Stock नं कामकाजाच्या सत्रादरम्यान १०७५ रुपयांपर्यंत घसरला होता. आपल्या आयपीओ इश्यू प्राईजपेक्षा हा शेअर ५० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. आय़पीओमध्ये याची इश्यू प्राईज २१५० रुपये होती. याप्रकारे आयपीओमध्ये गुंतवणूक केलेल्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. Paytm ची ऑपरेटर कंपनी One97 communications चं लिस्टिंग १८ नोव्हेंबर २०२१ रोजी झालं होतं. शेअर्सच्या घसरणीमागे Macquarie चं नवं टार्गेट आहे. ब्रोकरेज हाऊसच्या म्हणण्यानुसार paytm च्या व्यवसायात पुढे महसूलाबाबत दबाव पाहायला मिळू शकतो. Macquarie कंपनीचं टार्गेट प्राईज १२०० रुपयांवरून कमी करून ९०० रुपये केलं आहे.