Paytm Zomato Deal : मागील काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या फिनटेक कंपनी पेटीएमने (Paytm) आपला मूव्ही आणि इव्हेंट तिकीट व्यवसाय विकण्याची तयारी केली आहे. यासाठी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोशी(Zomato) बोलणी सुरू झाली असून, 1500 कोटी रुपयांमध्ये करार होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घातल्यानंतर पेटीएमच्या व्यवसायाला मोठा फटका बसला, त्यामुळे कंपनीला विविध पर्यायांवर विचार करावा लागत आहे.
फक्त पेमेंट व्यवसायवर लक्ष
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेटीएमची मूळ कंपनी One97 कम्युनिकेशन्स आणि झोमॅटो यांच्यात मूव्ही आणि इव्हेंट तिकीट व्यवसाय विकण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मूव्ही आणि इव्हेंट तिकीट व्यवसाय विकून कंपनी आपल्या UPI पेमेंट सेगमेंटमध्ये लक्ष केंद्रित करू इच्छिते. हा व्यवसाय विकण्यासाठी झोमॅटोशिवाय इतर कंपन्यांचाही गांभीर्याने विचार केला जात आहे.
पेटीएमच्या विक्रीत पहिल्यांदाच घट
विजय शेखर शर्मा यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पेटीएमने गेल्या महिन्यात सांगितले होते की, त्यांच्या विक्रीत पहिल्यांदाच घट झाली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईमुळे कंपनीच्या फिनटेक व्यवसायाला मोठा फटका बसला. आपला व्यवसाय वाचवण्यासाठी कंपनीने 4 बँकांचीही मदत घेतली. तरीदेखील कंपनीला आपले नुकसान भरुन काढता आले नाही.
झोमॅटोचा डिजिटल व्यवसायही मोठा होणार
पेटीएमने मूव्ही आणि इव्हेंट तिकीट व्यवसायाचे आकडे उघड केलेले नाहीत. परंतु, मार्च 2024 मध्ये $17.4 अब्ज वार्षिक विक्री गाठली होती. यामध्ये मूव्ही आणि इव्हेंट तिकीट, तसेच क्रेडिट कार्ड मार्केटिंग आणि गिफ्ट व्हाउचर व्यवसायाचा समावेश आहे. जर पेटीएमचा Zomato सोबतचा करार यशस्वी झाला, तर कंपनी ट्रॅव्हल, डील्स आणि कॅशबॅक व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकेल. यातून पेटीएमला त्यांचा लेल्स आणि मर्चंट बेस वाढवण्यात मदत होईल. दुसरीकडे झोमॅटोचा डिजिटल व्यवसायही मोठा होणार आहे.