नवी दिल्ली - ई वॉलेट कंपनी पेटीएमच्या मालकाकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पेटीएमचे संस्थापक अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनीच ही खंडणी मागितली होती. कंपनीचा चोरलेला महत्वपूर्ण आणि गोपनीय डेटा लीक करणार असल्याची धमकी या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांना दिली होती. विशेष म्हणजे त्यांच्या महिला सेक्रेटरीनेच हा मास्टर प्लॅन रचला होता.
विजय शेखर शर्मा यांची सेक्रेटरी असलेल्या महिला कर्मचाऱ्यानेच हा मास्टर प्लॅन आखला होता. पेटीएमच्या युजर्संना माहिती लीक करुन कंपनीची प्रतिमा मलिन करण्याची आणि कंपनीला नुकसान पोहोचविण्याची धमकी या तिघांनी दिली होती. कंपनीच्या नोएडा येथील मुख्य कार्यालयातील या तीन कर्मचाऱ्यांना सेक्टर 20 पोलीस स्थानकातील पथकाने अटक केली आहे. तसेच याप्रकरणी आणखी चौथ्या आरोपीचे नावही पुढे येण्याची शक्यता असून ती मोठी व्यक्ती असल्याचे संबंधित यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पेटीएमचे मालक विजय शेखर शर्मा यांनी कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांनी महत्वाचा डेटा चोरून खंडणी मागितल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.