पेटीएमच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पेटीएमवर सुरू असलेले संकट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने Paytm च्या बँकिंग युनिट पेटीएम पेमेंट्स बँकेतील संशयास्पद उल्लंघनाची चौकशी करण्यास ईडीला सांगितले होते. ईडीने कंपनीच्या कामकाजाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.
फिनटेक कंपनीची फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्टच्या विशेष तरतुदींनुसार चौकशी केली जात आहे, यात व्यक्ती आणि कॉर्पोरेट्सने परदेशात केलेल्या हस्तांतरणाचा समावेश आहे. सध्या फक्त ईडी आणि आरबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहेत. इतर यंत्रणांकडून अतिरिक्त मदत हवी असल्यास ती नक्कीच घेतली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत सरकारी हस्तक्षेप होणार नाही, असं सांगण्यात येत आहे.
एका आहवालानुसार, आरबीआयने ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. ईडीने आरबीआयकडून पेटीएमवरील कागदपत्रेही मागवली आहेत. याशिवाय संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यासही केला जात आहे. नियामकांमधील माहिती सामायिक करण्यासाठी एक यंत्रणा आहे आणि माहिती आधीच गोळा केली आहे आणि विविध एजन्सी त्यांची चौकशी करत आहेत.
पेटीएमने दिलेली माहिती अशी, कंपनी नियामक अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे. One97 Communications Limited आणि तिचे सहयोगी पेटीएम पेमेंट्स बँकेबद्दल माहिती देण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. आम्हाला ईडीसह अनेक नियामक आणि कायदेशीर अंमलबजावणी प्राधिकरणांकडून माहिती आणि स्पष्टीकरण देण्यास सांगितले जाऊ शकते.
RBI ने पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे. हा आदेश २९ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. पेटीएम पेमेंट बँकेच्या अंतर्गत वॉलेट आणि यूपीआय देखील आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्यवर्ती बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला एक महिन्याची मुदत दिली आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.