नवी दिल्ली : कोणताही वाद ओढवला किंवा अन्य स्थितीत केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कौटुंबिक पेन्शनसाठी पतीऐवजी तिचा मुलगा किंवा मुलांची नावे देता येणार आहेत. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (डीओपीपीडब्ल्यू) यासाठी मंगळवारी परवानगी दिली आहे. यासाठी पेन्शन कायद्यात बदल करण्यात आला आहे.
डीओपीपीडब्ल्यूचे सचिव व्ही. श्रीनिवास म्हणाले की, घटस्फोटाचे दावे दाखल असलेल्या, घरगुती हिंसाचाराच्या अधिनियमानुसार दाखल केलेल्या, भारतीय दंडविधानानुसार दाखल करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये महिलांना कायद्यातील या सुधारणेमुळे कौटुंबिक पेन्शनसाठी पतीऐवजी पात्र असलेल्या मुलाचे नाव आता देता येणार आहे. आमच्या विभागाकडे अशा प्रकरणांचे अनेक अर्ज आले आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाशी चर्चेनंतर कायद्यात ही सुधारणा केली आहे.
कायद्यात सुधारणा -
काही कारणास्तव मृत कर्मचाऱ्याची पती वा पत्नी कौटुंबिक पेन्शनसाठी अपात्र ठरली वा तिचा मृत्यू झाला तरच कुटुंबातील अन्य सदस्य या पेन्शनला पात्र ठरत असत. परंतु, या कायद्यातील सुधारणेमुळे महिला कर्मचाऱ्यांना आता कौटुंबिक पेन्शनसाठी पतीऐवजी मुलांची नावे देता येणार आहेत.