Join us

Pension: पेन्शनरांना घरबसल्या मिळणार जिवंत असल्याचे प्रमाणपत्र; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 1:32 PM

Pension life certificate Online: एसबीआयने निवृत्तांसाठी खास वेबसाइटही तयार केली आहे. निवृत्तांना या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ते सहजपणे लॉग इन करू शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवृत्ती वेतन सुरू राहावे यासाठी निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देणारी नवी सेवा स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू केली आहे. याअंतर्गत बँकेचे पेन्शन खातेधारक घरबसल्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे हयात प्रमाणपत्र सादर करू शकतील. या नवीन सेवेला बँकेने ‘व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट सर्व्हिस’ असे नाव दिले आहे.एसबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट सेवा ही एक सोपी, सुरक्षित, कागदविरहित आणि मोफत सुविधा आहे. यामध्ये निवृत्तांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि पॅन कार्ड आवश्यक असेल. 

एसबीआयने निवृत्तांसाठी खास वेबसाइटही तयार केली आहे. निवृत्तांना या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ते सहजपणे लॉग इन करू शकतात. या वेबसाइटमुळे निवृत्ती वेतनाशी संबंधित अनेक कामे सुलभ होतील. वेबसाइटवर युजर एरियर कॅलक्युलेशन शीट डाउनलोड करता येईल. पेन्शन स्लिप किंवा फॉर्म-१६ डाउनलोड करता येईल. पेन्शन प्रोफाइल डिटेल्स, गुंतवणूक माहिती आणि हयात प्रमाणपत्राची स्थितीही तपासता येईल. बँकेत केलेल्या व्यवहारांची माहितीही या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे.

असा दाखल करता येईल अर्ज

  • निवृत्ती वेतनधारकांनी प्रथमत: अधिकृत वेबसाइट https://www.pensionseva.sbi/ वर जावे.
  • पेन्शन सेवा वेबसाइटचवर ड्रॉप डाऊनमधून ‘व्हिडिओ एलसी‘ निवडा. तुमचा एसबीआय पेन्शन खाते क्रमांक टाका. त्यानंतर नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मिळालेला ओटीपी सादर करून नियम व अटी स्वीकारा आणि ‘स्टार्ट जर्नी’वर क्लिक करा.
  • व्हिडिओ कॉलदरम्यान पॅन कार्ड तयार ठेवल्यानंतर ‘आय ॲम रेडी’वर क्लिक करा.
  • व्हिडिओ कॉल सुरू करण्यासाठी, कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशन संबंधित परवानगी द्या.
  • एसबीआयचा एखादा अधिकारी व्हिडिओ कॉलवर येईल. हवे असल्यास, तुम्ही तुमच्या सोयीनुसार व्हिडिओ कॉल नियोजित करू शकता.
  • व्हिडिओ कॉल सुरू झाल्यावर पेन्शनधारकास पडताळणी कोड मिळेल. तो एसबीआय अधिकाऱ्यास सांगा.
  •  व्हिडिओ कॉलवर तुमचे पॅन कार्ड दाखवा. एसबीआयचे अधिकारी ते कॅप्चर करतील तसेच पेन्शनधारकाचा फोटोही काढतील. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.
टॅग्स :निवृत्ती वेतनएसबीआय