Nirmala Sitharaman On EMI : गेल्या अनेक महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केलेली नाही. त्यामुळे कर्जाचे व्याजदर अधिक आहेत. सध्या ग्राहक रिझर्व्ह बँक रेपो दरात कधी कपात करेल आणि वाढलेल्या ईएमआयपासून कधी दिलासा मिळेल याकडे लक्ष लावून आहेत. दरम्यान, केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील यावर आता वक्तव्य केलं आहे. सध्याचे व्याजदर हे कर्ज घेणाऱ्यांसाठी समस्या ठरत असल्याचं वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केलं.
परवडणाऱ्या व्याजदरांसाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचंही सीतारामन म्हणाल्या. अधिक परवडणाऱ्या दरांच्या गरजेवर भर देताना सीतारामन म्हणाल्या की, जेव्हा व्यवसायांचा विस्तार करायचा असेल तेव्हा हे अतिशय महत्वाचं आहे. बँकांनी कर्ज देण्याच्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करावं, असं आवाहन त्यांनी केलं. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इंडिया बिझनेस अँड इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी उच्च व्याजदर किती तणावपूर्ण असू शकतात याचा पुनरुच्चार केला. आर्थिक विकासदर मंदावण्याच्या शक्यतेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच अर्थमंत्र्यांनी देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांची सरकारला पूर्ण जाणीव असल्याची ग्वाही दिली. तसंच विनाकारण काळजी करण्याची गरज नसल्याचंही त्या म्हणाल्या.
दबाव वाढवणारे व्याजदर
महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण भारताच्या विकासाच्या गरजा पाहता आणि त्याच वेळी अनेकांकडून व्याजदर अधिक दबाव निर्माण करणारे आहेत असं मत समोर येतं. अशा वेळी उद्योग तेजीनं पुढे जावे आणि क्षमता वाढली पाहिजजे असं वाटतं, तेव्हा व्याजदर अधिक स्वस्त असले पाहिजे, असं सीतारामन म्हणाल्या.
इन्शुरन्सबाबत केलं वक्तव्य
विमा उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या विक्रीमुळे अप्रत्यक्षपणे एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेसाठी कर्ज घेण्याचा खर्च देखील वाढतो, असंही त्यांनी नमूद केलं. विशेषत: अन्नधान्याच्या किमतीतील चढ-उतारामुळे, निर्मला सीतारामन यांनीही देशातील महागाईच्या अस्थिरतेची कबुली दिली. वाढती महागाई असूनही अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात करावी, अशी विनंती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी केली होती.
बँकांनी विमा विक्री केल्यानं त्याची व्याप्ती नक्कीच वाढली आहे, परंतु उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या विक्रीची चिंताही वाढली आहे. यामुळे नकळतपणे ग्राहकांसाठी कर्ज घेण्याचा खर्चही वाढतो. त्यामुळे बँकांनी आपल्या कोअर बँकिंग कामांवर अधिक लक्ष केंद्रित करावं आणि विनाकारण विमा लादून ग्राहकांवर बोजा टाकू नये. बँकिंग क्षेत्रावरील लोकांचा विश्वास वाढविण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. बँका कशा प्रकारे सेवा देतात आणि प्रत्येक ग्राहकाच्या गरजा कशा समजून घेतात यावरून विश्वास निर्माण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.