रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एक बैठक पार पडली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलं. "बँकांनी त्यांच्या कोअरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. बँकांनी आपल्या ठेवी वाढवण्यावर भर द्यावा. बँकांचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ठेवी स्वीकारणं आणि नंतर लोकांना कर्ज देणे," असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.
"बँकांमधील ठेवींची गती संथ आहे. जास्तीत जास्त लोक बँकांमध्ये पैसे जमा करतील यासाठी बँकांनी काही नाविन्यपूर्ण आणि आकर्षक पोर्टफोलिओ आणण्याचा विचार केला पाहिजे. सध्या लोकांना अधिक परतावा मिळवण्याचे अनेक मार्ग दिसत आहेत, त्यापैकी एक शेअर बाजार आहे. त्यामुळेच शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. लोकांनी बँकेत पैसे जमा करावेत यासाठी बँकांनी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची गरज आहे," असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.
सुधारणा कायद्यामागे अनेक कारणं
"बँकिंग नियमांमध्ये सुधारणा होत आहेत. सुधारणा कायदा आणण्यामागे अनेक कारणं आहेत. तो काही काळ प्रलंबित होता आणि बराच काळ त्याची प्रतीक्षा होती. हे ग्राहकाभिमुख पाऊल आहे," असं त्यांनी नमूद केलं. ग्राहकांसाठी हा पर्याय असणं महत्वाचं आहे आणि नॉमिनीला नंतर त्याच्या योग्य गोष्टीचा दावा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही याची खात्री करणे देखील महत्वाचं आहे, असं आपल्याला वाटत असल्याचं सीतारामन म्हणाल्या.
काय म्हणाले दास?
बँकांच्या व्याजदरातील अस्थिरतेच्या प्रश्नावर शक्तिकांत दास यांनी प्रतिक्रिया दिली. "बँका त्यांच्या ठेवींचे दर ठरवतात आणि त्यांचे व्याजदरही तेच ठरवतात. ही परिस्थिती प्रत्येक बँकेत वेगवेगळी असू शकते. आपले वास्तविक व्याजदर फारसे अस्थिर नाहीत. ते बऱ्याच अंशी स्थिर आहेत," असं ते म्हणाले.