Join us  

प्रवासात घरपण देणारी माणसं! 'होम स्टे'च्या स्टार्टअपची भरारी, भारतीय कंपन्यांचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 8:02 AM

देशात किंवा परदेशात प्रवास करताना सर्वाधिक पैसे हे खरंतर विमान आणि हॉटेल या दोन गोष्टींवर खर्च होतात. अशावेळी मग बाकीच्या गोष्टींसाठी फारसे बजेट राहतेच असे नाही.

मनोज गडनीस,  विशेष प्रतिनिधी

देशात किंवा परदेशात प्रवास करताना सर्वाधिक पैसे हे खरंतर विमान आणि हॉटेल या दोन गोष्टींवर खर्च होतात. अशावेळी मग बाकीच्या गोष्टींसाठी फारसे बजेट राहतेच असे नाही. अनेकवेळा खर्चाचा विचार करता प्रवासही आटोपता घ्यावा लागतो. मात्र, प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेत गेल्या काही वर्षांपासून ‘होम-स्टे’, या स्टार्टअप उद्योगाने भरारी घेतली असून, आतापर्यंत या क्षेत्रात लहानमोठ्या अशा आठ भारतीय कंपन्यांनी देशातील किमान साडेआठ लाख घरांशी करार करत ती घर, प्रवाशांच्या मुक्कामासाठी उपलब्ध करून दिली आहेत.काय आहे संकल्पना ?पर्यटन असेल किंवा ऑफिसचे काम, अनेक लोक महिन्यांतून भरपूर प्रवास करत असतात. अशावेळी हॉटेल एकतर महाग पडते किंवा मग सतत हॉटेलमध्ये राहूनही कंटाळा येतो आणि पुन्हा हॉटेलमध्ये राहायचे म्हटले की, त्यांच्या चेक इन-चेक आऊटच्या वेळेतच प्रवासाचे गणित बसवावे लागते. या अडचणी विचारात घेत ब्रेन चेस्की आणि जो गेगीबा या दोन अमेरिकी तरुणांनी झोपणे, अंघोळ आणि ब्रेक फास्ट इतकी मर्यादित सोय २००९ मध्ये स्वतःच्या घरातून सुरू केली. लोकांच्या सोयीनुसार ही सेवा उपलब्ध झाल्याने त्यांच्या घरात बुकिंग वाढू लागले. मग या दोघांनी आपल्या काही मित्रांच्या घरातील अतिरिक्त जागा भाड्याने घेत त्यांची देखील भाडेतत्त्वावर विक्री करण्यास सुरुवात केली. अल्पावधीत ही संकल्पना इतकी लोकप्रिय झाली की, आज एअर बीएनबी नावाच्या त्यांच्या कंपनीने जगभरातील कोट्यवधी घरांत जागा घेतली असून ते वर्षाकाठी अब्जावधी अमेरिकी डॉलर्सचा व्यवसाय करत आहेत. 

विस्तार कसा होत आहे ?हॉटेल उद्योगाच्या संघटनेने गेल्यावर्षी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतामध्ये पर्यटन अथवा ऑफिसच्या कामासाठी प्रवास करणाऱ्या लोकांपैकी ६७ टक्के लोक हे हॉटेलला पसंती देत आहेत. मात्र, २०१५ पासून होम-स्टेकडे देखील कल वाढत असून त्याची टक्केवारी सध्या १९ टक्के इतकी आहे. वर्षाकाठी यामध्ये १२ टक्क्यांची सातत्यपूर्ण वाढ नोंदली गेली आहे. भारतामध्ये होम-स्टेची सुविधा देणाऱ्या आठ प्रमुख कंपन्या आहेत तर २० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील भारतात या व्यवसायात कार्यरत आहेत. तुम्हालाही हा व्यवसाय करता येईल का ? जर तुमच्या राहत्या घराखेरीज तुमच्याकडे आणखी एखादे घर असेल किंवा फार्म हाऊस अथवा सेकंड होम असेल तर ते नुसते पडून राहण्यापेक्षा होम-स्टे कंपन्यांना उपलब्ध करून दिले तर अधिकचे उत्पन्न तुम्हाला मिळू शकेल. तसेच, सातत्याने तिथे लोकांचा राबता  राहिल्याने घर देखील मेन्टेन राहू शकेल. तुम्हाला तुमचे घर वर्षाचे १२ महिने भाड्याने देण्याची गरज नाही. तुमच्या सोयीने हवे तितकेच दिवस तुम्ही घरातील जागा भाडेतत्त्वावर देऊ शकता.

टॅग्स :सुंदर गृहनियोजन