ओमनीचॅनल फर्निचर कंपनी पेपरफ्रायचे (Pepperfry) को-फाऊंडर आणि सीईओ अंबरीश मूर्ती यांचं सोमवारी कार्डियाक अरेस्टनं निधन झालं. ते ५१ वर्षांचे होते. पेपरफ्रायचे को-फाऊंडर आशिष शाह यांनी मंगळवारी सकाळी ट्वीटद्वारे यासंदर्भातील माहिती दिली.
"माझा मित्र, गुरू, भाऊ आणि सोबती अंबरीश मूर्ती या जगात नाही सांगताना मला दु:ख होतंय. काल रात्री लेह येथे कार्डियाक अरेस्टनं निधन झालं. त्यांच्यासाठी प्रार्थना करा," असं ट्वीट आशिष शाह यांनी केलं. २०१२ मध्ये अंबरीश मूर्ती यांनी आशिष शाह यांच्यासोबत पेपरफ्रायची सुरुवात केली होती आणि लीडिंग ऑनलाइन फर्निचर विक्रेत्याच्या रुपात कंपनी नावारुपाला आली होती. अंबरीश मूर्ती पेपरफ्रायच्या आयपीओद्वारे शेअर बाजारात लिस्टिंगची योजना आखत होते.
कसा होता प्रवासमूर्ती यांनी आपल्या करिअरची सुरूवात जून १९९६ मध्ये कॅडबरीच्या सेल्स आणि मार्केटिंग टीमसह केली. साडेपाच वर्षे कॅडबरीसह काम केल्यानंतर त्यांनी फायनान्शिअल सेक्टरमध्ये प्रवेश केला आणि व्हिपी मार्केटिंग आणि ग्राहक सेवेच्या माध्यमातून प्रूडेन्शिअल आयसीआयसीआय एएमसीसह (सध्याची आयसीआयसीआय प्रूडेन्शिअल) काम करू लागले. या ठिकाणी त्यांनी दोन वर्ष काम केलं. त्यानंतर त्यांनी लेव्हीसह काम सुरू केलं आणि त्या ठिकाणी ते पाच महिन्यांपर्यंत कार्यरत होते.
त्यांनी ब्रिटानियामध्येही मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं. या ठिकाणी ते सात महिने कार्यरत होते. यानंतर ते eBay मध्ये गेले. या ठिकाणी ते भारत, फिलिपिन्स आणि मलेशियाचे कंट्री मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं.