Join us

मुकेश अंबानींची पेप्सी आणि कोका-कोलाने घेतली धास्ती; पुन्हा वापरणार जुने डावपेच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 4:28 PM

Cold Drink Price War : पेप्सी आणि कोका-कोला मुकेश अंबानींच्या कॅम्पा कोलाची बाजारपेठेत वाढती पकड पाहून चिंतेत आहेत. या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मुकेश अंबानींच्या या उत्पादनाला सामोरे जाण्यासाठी रणनिती आखली आहे.

Cold Drink Price War : उद्योगपती मुकेश अंबानी ज्या क्षेत्रात उतरतात तिथं धुमाकूळ घालतात हा इतिहास आहे. उदाहरण द्यायचं झालं तर जिओचं देता येईल. मोबाईल नेटवर्क क्षेत्रात जिओची एन्ट्री झाल्यापासून डझनभर कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. अंबानींची रिलायन्स कंपनी आता आणखी क्षेत्रात उतरत आहे. मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्सने कॅम्पा कोला बाजारात आणल्यापासून पेप्सी आणि कोका-कोला या प्रतिस्पर्धी कंपन्यांची झोप उडाली आहे. कॅम्पा कोलाने हळूहळू बाजारात पकड मिळवली आहे. या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्या (पेप्सी आणि कोका-कोला) कॅम्पा कोलाला शह देण्यासाठी जुने डावपेच वापरण्याचाही विचार करत आहेत.

भारतीय बाजारपेठेला डोळ्यांसमोर ठेऊन पेप्सी आणि कोका-कोला कंपनी पुन्हा एकदा वाजवी दरात कोल्ड्रिंक्स घेऊन येण्याच्या विचारात आहेत. सॉफ्ट ड्रिंक्स उद्योगाच्या अधिकाऱ्यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले की पेप्सिको आणि कोका-कोला त्यांच्या मुख्य ब्रँडपेक्षा १५-२०% स्वस्त असलेले शीतपेय बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स कॅम्पा-कोलाच्या वाढत्या मागणीला यामुळे खिळ बसेल असा कंपनीचा दावा आहे.

काय आहे पेप्सीचा प्लॅन?रिलायन्स बाजारात पकड मिळवण्यासाठी अनेक पद्धती वापरत आहे. कॅम्पा कोला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते किरकोळ विक्रेत्यांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त मार्जिन देत आहे. रिलायन्स ग्राहक किरकोळ विक्रेत्यांना ६-८% मार्जिन ऑफर करत आहे, तर इतर शीतपेय कंपन्या ३.५-५% मार्जिन देत आहेत. अशा परिस्थितीत पेप्सी आणि कोका-कोला त्यांची स्वस्त उत्पादने बाजारात आणण्याचा विचार करत आहेत किंवा बी-ब्रँड लॉन्च करू शकतात. कारण या कंपन्या त्यांच्या मुख्य ब्रँडची प्रतिमा आणि मार्जिन कमी करणार नाहीत.

कोका-कोलाचा प्लॅन काय?कोका-कोलाने देखील कॅम्पा कोलाला रोखण्याची योजना तयार केली आहे. कोका-कोलाच्या योजनांबद्दल माहिती असलेल्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की कंपनी विशेषत: टियर-2 मार्केटसाठी नवीन धोरण तयार करत आहे. यासाठी कंपनी फक्त १० रुपयांना काचेच्या बाटल्यांमध्ये कोल्ड्रिंक विकण्याचा विचार करत आहे. कंपनीने यापूर्वीच या किमतीत काचेच्या बाटल्यांमध्ये थंड पेये विकली आहेत.

किमतीचा खेळ कसा?रिलायन्स कंझ्युमर कॅम्पा कोलाची २०० मिलीची बाटली १० रुपयांना विकत आहे. तर कोका-कोला आणि पेप्सिको २५० मिली बाटल्या २० रुपयांना विकत आहेत. कॅम्पा कोलाच्या ५०० मिलीच्या बाटलीची किंमत २० रुपये आहे, तर कोकची किंमत ३० रुपये आणि पेप्सीची ४० रुपये आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सव्यवसाय