कोला मार्केटमध्ये पुन्हा एकदा हालचालींना वेग आलाय. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची (RRVL) उपकंपनी असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सनं (RCPL) श्रीलंकेच्या एलिफंट हाऊससोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सनं संपूर्ण भारतात एलिफंट हाऊस ब्रँड अंतर्गत कोल्डड्रिंकचं उत्पादन, विक्री आणि वितरण करण्याचे अधिकार मिळवले आहेत. हा करार अशा वेळी झाला आहे जेव्हा २०२२ मध्ये, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सनं प्युअर ड्रिंक ग्रुपकडून कॅम्पा कोलासाठी २२ कोटी रुपयांचा करार केला होता. एलिफंट हाऊससोबत आरसीपीएलच्या ताज्या करारामुळे पेप्सिको आणि कोका कोलासमोर आव्हान निर्माण होईल.
आरसीपीएलकडे आधीच कॅम्पा, सोसयो आणि रस्किक सारखे सुप्रसिद्ध ब्रँड आहेत. एलिफंट हाऊस ब्रँड आरसीपीएल सोबत जोडला गेल्यानंतर कंपनीचा शीतपेय पोर्टफोलिओ आणखी मजबूत होईल. एलिफंट हाऊस सिलोन कोल्ड स्टोअर्स पीएलसीच्या मालकीचं आहे. ही श्रीलंकेतील सर्वात मोठा लिस्टेड समूह जॉन कील्स होल्डिंग्स पीएलसीची एक उपकंपनी आहे. एलिफंट हाऊस ब्रँड अंतर्गत, ते नेक्टो, क्रीम सोडा, ईजीबी (जिंजर बीअर), ऑरेंज बार्ली आणि लेमोनेड यांसारख्या निरनिराळ्या कोल्डड्रिंकचं उत्पादन आणि विक्री करते.
काय म्हटलंय रिलायन्सनं?
“एलिफंट हाऊस हा एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड आहे. ही भागीदारी आमच्या वाढत्या एफएमजीसी पोर्टफोलिओमध्ये केवळ त्यांची अत्यंत आवडती पेयं जोडणार नाही, तर भारतातील ग्राहकांना दर्जेदार उत्पादनांद्वारे उत्तम पर्याय आणि मूल्य देखील प्रदान करेल,' अशी प्रतिक्रिया रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्सचे सीओओ केतन मोदी म्हणाले.
रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडसोबतची आमची भागीदारी आमच्या ब्रँडच्या प्रवासात मैलाचा दगड ठरणार असल्याची प्रतिक्रिया जॉन कील्स ग्रुपचे चेअरपर्सन कृष्णा बालेंद्र यांनी दिली.