मुंबई : कोविड काळानंतर आता अर्थव्यवस्थेत पुन्हा सुधारणा होऊ लागल्यामुळे भांडवली बाजाराकडे सामान्य गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार डीमॅट खात्यांची संख्या साडेनऊ कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, म्युच्युअल फंडातही तब्बल साडेपाच कोटी सामान्य गुंतवणूकदार सहभागी झाले आहे.सरत्या दोन वर्षांत कोरोना, लॉकडाऊन आदी कारणांमुळे अर्थचक्राचा वेग मंदावला. परिणामी सामान्य गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात काहीसा ब्रेक घेतल्याचे चित्र होते. मार्च २०२० मध्ये देशातील डीमॅटधारकांची संख्या पाच कोटी होती. मात्र, २०२१च्या मध्यापासून कोविड परिस्थिती आटोक्यात यायला लागली आणि सरत्या वर्षभरात या संख्येत चार कोटींची वाढ होत डीमॅटधारकांची संख्या आता ९ कोटी ४७ लाखांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एसआयपी खात्यांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असून, सुमारे साडेपाच कोटी लोकांनी याद्वारे गुंतवणूक केल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडाकडे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे.एप्रिल २०२२ मध्ये देशात २१ लाख ८२ हजार नवीन एसआयपी खाती सुरू झाली, तर मे महिन्यात हाच आकडा १९ लाख ७५ हजार इतका होता. सध्या चलनवाढ, वाढलेले व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय कारणांमुळे परदेशी वित्तीय संस्थांचा भारतीय भांडवली बाजारातील कल हा विक्रीकडे आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२२ मध्ये आतापर्यंत परदेशी वित्तीय संस्थांनी सुमारे २ लाख ६७ हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे. मात्र, या तुलनेत देशांतर्गत वित्तीय संस्थांचा कल मात्र खरेदीकडे असल्याचे आकडेवारीवरून दिसते. २०२२ मध्ये आतापर्यंत देशांतर्गत वित्तीय संस्थांनी २ लाख १५ हजार कोटी रुपये मूल्यांच्या समभागांची खरेदी केली आहे. शेअर बाजाराबद्दल तसेच म्युच्युअल फंड योजनांबाबत सामान्य गुंतवणूकादारांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. निश्चित परतावा देणाऱ्या योजनांचे व्याजदर सातत्याने घसरत आहेत. या तुलनेत भांडवली बाजारामध्ये होणाऱ्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर परतावा उत्तम मिळत आहे.
एसआयपीधारकांची संख्या साडेपाच कोटी प्रति महिना किमान ५०० रुपयांपासून सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंड योजनेत सहभागी होता येते. गुंतवणुकीची किमान रक्कम आवाक्यात असल्यामुळे अनेक लोक याला पसंती देताना दिसत आहेत. एकाच वेळी मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीऐवजी महिन्याकाठी निश्चित रक्कम बाजारात गुंतवली तर बाजारात होणाऱ्या चढ-उतारांचा दीर्घकाळात चांगला फायदा होत असल्यामुळेही लोक एसआयपी प्रकाराला पसंती देत आहेत. देशात एसआयपीअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या ही ५ कोटी ४८ लाख इतकी आहे.